कधी होणार खापरी-बुरांडा मार्गाचे काम ? खापरीवासी संतप्त
वर्षभरापासून मिळणा-या आश्वासनामुळे ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
सुरेश पाचभाई, बोटोणी: बुरांडा ते खापरी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून वाहनाने प्रवास करणे तर सोडा पायदळ जाणे ही अवघड झाले आहे. या बाबत खापरी येथील नागरिकांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला. परंतु खापरीवासीयांना आश्वासनाशिवाय दुसरे काहीही मिळाले नाही. त्यामुळे आता खापरी येथील रहिवाशी आक्रमक झाले असून जर या रस्त्याचे लवकरात लवकर काम न केल्यास मोठे आंदोलन उभारले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे.
खापरी हे मारेगाव तालुक्यातील नवरगाव धरण या मध्यम प्रकल्पाच्या काठावर असलेलं एक छोटसं गाव आहे. हा रस्ता दोन किमीचा आहे. बुरांडा मार्गेच त्यांना तालुक्यात येणे जाणे करावे लागते. सोळा वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम झाले. मात्र हा पुराच्या पाण्यात हा रस्ता वाहून गेला. तेव्हापासून केवळ डागडुजीवरच हा रस्ता टिकून आहे. पावसाळ्यात तर या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य असते. त्यामुळे जीव मुठीत घेऊन गावक-यांना या मार्गाने प्रवास करावा लागतो.
मे महिन्यात या 2 किलोमीटरच्या रस्त्यापैकी फक्त एक कि.मी अंतराची तात्पुरती डागडुजी करण्यात आली. मात्र डागडुजीही निकृष्ट दर्जाची असल्याने काही दिवसांमध्येच हा रस्ता जैसे थे झाला. हा रस्ता जिल्हा परीषद अंतर्गत येत असुन सबंधित अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी विचारणा केली असता तुमचा रोड मंजूर असून लवकरच याचे काम होईल असे आश्वासन गेल्या वर्षभरापासून गावक-यांना मिळत आहे.
काही दिवसांआधी जिल्हाधिकारी अमोल येडगे हे बुरांडा येथे कृषी विभाग अंतर्गत शेत पिक पाहणी करण्यासाठी आले होते. त्या वेळी खापरी ग्रामस्थांनी जिल्हा अधिकारी यांना निवेदन दिले. मात्र त्यावर सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. अखेर सततच्या आश्वासनाला कंटाळून खापरी वासीयांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.