कोलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव
शिंदोला: वणी तालुक्यातील कोलगाव (साखरा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव आहे. परिणामी रूग्णांना आर्थिक भूर्दंड सोसत खासगी दवाखान्यात उपचार करावे लागते. त्यामुळे आरोग्य विभागाने सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
कोलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत साधारणतः ३० ते ३५ गावातील नागरिकाना आरोग्य सेवा पुरविल्या जातात. परिसरात कोळसा खाणी, सिमेंट उद्योग असल्याने प्रदूषनाचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे दमा, त्वचेचे रोग, खोकला आदी रुग्ण आढळून येते. उपचारासाठी रुग्ण सदर आरोग्य केंद्रात जातात. मात्र आधुनिक यंत्रसामुग्रीचा अभाव, औषधाचा तुटवडा असल्याने आजारी व्यक्तीला योग्य उपचार मिळत नाही. परिणामी नाइलाजास्तव रुग्णाला खासगी दवाखान्यात उपचार करावे लागते.
परिसरातील अपघातग्रस्त व्यक्तीला, गरोदर स्त्रीयांना योग्यवेळी रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. त्यामुळे अन्य खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो. सदर आरोग्य केंद्र परिसरातील गावांच्या केंद्रस्थानी नसल्याने गैरसोयीचे ठरत आहे. लाखो रुपये खर्चून उभारलेले आरोग्य केंद्र शोभेची वास्तू ठरत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी आहे.