रवि ढुमणे, वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रांगणा येथील दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्याला वणी पोलिसांनी सहा महिन्यांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
तालुक्यातील रांगणा येथील १६ वर्षीय विद्यार्थिनी जवळच असलेल्या नांदेपेरा येथील शाळेत शिक्षण घेत होती. गेल्या सहा महिन्यांपूर्वी दहावीची परीक्षा सुरू असताना सदर मुलगी बेपत्ता झाली होती. प्रसंगी वडीलांनी यासंबंधीची तक्रार वणी ठाण्यात दाखल केली होती. त्यावरून फूस लावून पळवून नेल्यासंबंधीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्याचा तपास वणी पोलीस करीत होती मात्र अल्पवयीन मुलगी व पळवून नेणारा कुठेच गवसला नाही.
सदर घटनेतील पळवून नेणारा वणीतील आरिफ अली हमीद अली हा युवक वणी परिसरात आल्याची कुणकुण ठाणेदार बाळासाहेब खाडे यांना लागली. त्यांनी डीबी पथकाला पाचारण करून आरिफच्या मागावर पाठविले. यवतमाळ मार्गावरील निंबाळा टेकडीवरच्या परिसरातून त्याला ताब्यात घेतले. सोबतच गुजरात राज्यातील सुरत येथून आलेले दोघेही पोलिसांना गवसले आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून मुलगी बेपत्ता असल्याने तिचे वडील मुलीच्या शोधात होते. ठाणेदार बाळासाहेब खाडे रुजू होताच पित्याने ठाणेदाराची भेट घेऊन मुलीचा शोध घेण्याची विनंती केली. ठाणेदार खाडे यांनी तत्परतेने गेल्या सहा महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा शोध घेऊन दोघांनाही ताब्यात घेतले. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक संगीता हेलोंडे या करीत आहे. तूर्तास वैद्यकिय चाचणी अहवाल आल्यावरच अतिरिक्त गुन्हे दाखल होण्याची शक्यता बळावली आहे.