भास्कर राऊत, मारेगाव: शेतामध्ये असलेल्या बंड्यामधून वेचुन ठेवलेला कापूस आणि सोयाबीन भरलेली पोती रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरून नेल्याचे घटना वेगाव येथे घडली. या चोरी चोरट्यांनी सुमारे 2.5 लाखांचा शेतमाल पळवल्याचा अंदाज आहे. या घटनेमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतक-यांनी दिलेल्या माहितीनुसार, मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील शेतकरी सुजीत वसंत काकडे यांच्याकडे 10 एकर शेती आहे. त्यांच्या शेतामध्ये 30 बाय 25 चे टीनेचे शेड आहे. त्यांच्या शेतामध्ये 60 ते 70 क्विंटल कापूस आणि 32 क्विंटल सोयाबीन पोत्यात भरलेले होते. या शेताला तारेचे कुंपण सुद्धा केलेले आहे. दि. 10 डिसेंबरला रात्रीच्या वेळेस अज्ञात चोरटे शेतात चारचाकी घेऊन पोहोचले. त्यांनी शेतामध्ये असलेले सोयाबीन पोत्यांपैकी 21 क्विंटल सोयाबीन व 10 क्विंटल कापूस असा एकूण 2.5 लाखांचा शेतमाल लंपास केला.
शनिवारी सकाळी सालगडी वासुदेव दडांजे हा शेतात गेला असता त्याला चोरी झाल्याचे लक्षात आले. त्याने तातडीने याची माहिती मालकाला दिली. त्यावरून मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात भादंविच्या कलम 380, 461 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतीच्या उत्पन्नावर जगणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातील माल ऐन सुगीच्या दिवसांमध्येच चोरून नेल्याने शेतकरी हतबल झाला आहे. तालुक्यात मागील वर्षीही कापसाची चोरी मोठ्या प्रमाणात झाली होती. ते सर्व प्रकरण पेंडींग असतांनाच पुन्हा कापूस चोरीने डोके वर काढले आहे. गोधन तस्करी, कापूस चोरी, मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली कापसाची खेडा खरेदी यामुळेही अशा प्रकारच्या चोरीचे प्रमाण वाढलेले आहे. यावर निर्बंध ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
Comments are closed.