झरीजामनीत भाजपला जोरदार धक्का, सत्ताधारी भाजपला अवघी 1 जागा

प्रत्येकी 5 जागा जिंकत सेना-काँग्रेसची मुसंडी, जंगोमला 4 जागा... सत्तेसाठी महाविकास आघाडी की जंगोमसह आघाडी? सत्तास्थापनेची चुरशी वाढली

जितेंद्र कोठारी, वणी: आदिवासी बहुल भाग म्हणून ओळख असलेल्या झरीजामणी नगरपंचायत निवडणुकीचा निकाल लागला असून या निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसला आहे. झरीजामणी नगर पंचायतीच्या 17 जागांपैकी भाजपला फक्त 1 जागावर समाधान मानावे लागले आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनाला 5-5 जागा मिळाल्या. तर या निवडणुकीत पहिल्यांदाच उडी मारणारी आदिवासी संघटना ‘जंगोम दल’ यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत युती करत 4 जागा जिंकून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच मनसेने झरी तालुक्यात आपले खाते उघडले आहे. मनसेला 1 जागा मिळाली आहे. या नगरपंचायतीमध्ये महाविकास आघाडीला सत्ता स्थापनेची संधी असली तरी यातील एका पक्षाला बाहेर ठेऊन जंगोम सोबत युती करण्याचा पर्यायही खुला आहे. यामुळे सत्ता स्थापनेची चुरशी आणखीनच वाढली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात लहान नगर पंचायत झरी आहे. यावेळी ही दुसरीच पंचवार्षिक होती. या निवडणुकीत झरी नगरपंचायतीची फेररचना करून यात जवळील असलेल्या गावांचा समावेश करण्यात आला होता. गेल्या पंचवार्षीकमध्ये या नगरपंचायतीवर भाजपची सत्ता होती. या निवडणुकीत 17 जागांसाठी 87 उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. आज या निवडणुकीचा निकाल लागला आहे. 

निवडणुकीत काँग्रेसचे 5 उमेदवार निवडून आले आहेत. यात वैशाली श्रीराम भोयर, सुजाता श्रीकांत अनमुलवार, सोनाली प्रंशात सोयाम, दिनेश सुरेशलाल जयस्वाल, प्रभाकर अंबादास किनाके यांचा समावेश आहे. तर शिवसेनेच्या शीला पुंडलिक चौधरी, संतोष नानाजी मंचलवार, रजनी ज्ञानेश्वर नैताम, ज्योती संजय बिजनूरवार, श्रीराम मोतीराम मेश्राम यांनी 5 शिवसेनेच्या उमेदवारांनी विजयश्री खेचून आणली आहे.

जंगोम दलाला 4 जागा मिळाल्या. यात ज्ञानेश्वर बापूजी कोडापे, सीमा रामू मंडाळे, अनिल शंकर आत्राम व संगीता प्रशांत किनाके यांचा समावेश आहे. मनसेचे प्रवीण वासुदेवराव लेनगुळे, भाजपचे मुके जिजाबाई गंभीर मुके या निवडणूक आल्या आहेत. श्रीराम मोतीराम मेश्राम हे अपक्ष उमेदवार देखील निवडून आले आहे.

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना धक्का
झरी तालुका हा आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा गृह तालुका आहे. गेल्या नगर पंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे 7 उमेदवार निवडून आले होते. भाजपने शिवसेनेचा 1 उमेदवार व 1 अपक्ष नगरसेवकाच्या सहकार्याने नगरपंचायतीवर भाजपची सत्ता स्थापन केली होती. मात्र या निवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. 7 जागांवरून अवघ्या एका जागेवर आल्याने आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

महाविकास आघाडीची सत्ता की जंगोमची?
या निवडणुकीत काँग्रेसला 5 व शिवसेनेला 5 जागा मिळाल्या आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी 9 जागांची गरज आहे. सध्यातरी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी काँग्रेस आणि शिवसेनेला आघाडी करून सत्ता स्थापनेची संधी आहे. याबाबत येत्या दोन दिवसात वरीष्ठ पातळीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र इथे प्रत्येकी 5 जागा मिळाल्याने नगराध्यक्षपद कोणत्या पक्षाचा राहणार यावर तोडगा निघणे अवघड आहे. विशेष म्हणजे काँग्रेस आणि सेना या दोन्ही पक्षाला जंगोम पक्षासोबत युती करून सत्ता स्थापनेचा पर्यायही खुला आहे. झरी तालुक्यात प्रभाव असलेली जंगोम दलासारख्या संघटनेचा आपल्या पक्षाला फायदा व्हावा यासाठी दोन्ही पक्ष प्रयत्न कऱण्याची शक्यता आहे. जर नगराध्यक्षपदाचा वाद निर्माण होऊन यावर तोडगा निघाला नाही तर दोन्ही पक्षासाठी जंगोमसोबत आघाडी करण्याचा पर्यायही खुला आहे. त्यामुळे सत्तास्थापनेची चांगलीच चुरसी वाढली आहे. आता यावर वरिष्ठ काय निर्णय घेतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जंगोमने बिघडवले भाजपचे गणित? 
या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असलेला पक्ष हा जंगोम दल होता. जंगोम या शब्दाचा गोंडी भाषेत अर्थ क्रांती असे होतो. यावरून जंगोम दल स्थापन करण्यात आला आहे. झरी, पांढरकवडा, किनवट तसेच आदिवाशी बहुल भागात जंगोम दलाचा चांगला प्रभाव आहे. जंगोम दलाने वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली होती. या आघाडीने 4 जागा जिंकत परिसरातील आपली परिसरातील ताकत दाखवली आहे. जंगोमने घेतलेल्या या मुसंडीचा सर्वाधिक फटका हा भाजपला बसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण गेल्या वेळी भाजपसोबत असलेले अनेक मतदार हे यावेळी जंगोम सोबत गेल्याचे दिसून आले आहे. येत्या काळात जंगोम दल हा गेम चेंजर फॅक्टर ठरू शकतो. 

हे देखील वाचा:

मारेगाव नगरपंचायत निकाल: काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष, मनसेची मुसंडी

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.