जितेंद्र कोठारी, वणी: ऑनलाईन खरेदी केलेली औषधी परत करणे एका माजी सैनिकाला चांगलेच महागात पडले. औषधीचे 900 रुपये बँक खात्यात परत करण्याच्या नावाखाली ऑनलाईन ठगांनी त्यांच्या बँक खात्यातून तब्बल 2 लाख 34 हजार रुपये उडविले. याबाबत माजी सैनिकाने वणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.
प्राप्त माहितीनुसार बंडू शामराव मत्ते (59) हे भारतीय सेनेचे माजी सैनिक आहे. ते वणीतील जैन ले आऊटमध्ये राहतात. बंडू मत्ते यांनी एका ऑनलाईन वेबसाईटवरून काही औषध खरेदी केली होती. मात्र पसंत न पडल्यामुळे त्यांनी बुधवारी दिनांक 19 जानेवारी रोजी औषधी परत करण्याच्या दृष्टीने कंपनीच्या कॉल सेंटरवर फोन केला.
औषधीचे 900 रुपये त्यांच्या बँक खात्यात परत करण्याची बतावणी करून ठगाने मत्ते यांच्याकडून बँक खात्याची माहिती घेतली. त्यानंतर बंडू मत्ते यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया मधील 2 दोन खात्यामधून तब्बल 2 लाख 34 हजार रुपये उडविले. दोन्ही बँक खात्यातून 7 ट्रान्जॅक्शन द्वारे ही रक्कम वळती करण्यात आली.
बँक खात्यातून लाखो रुपये लंपास झाल्याचे कळताच त्यांनी बँकेकडे तक्रार केली. मात्र वणी येथील स्टेट बँक अधिकाऱ्यांनी मत्ते यांना पोलिसात तक्रार करण्याची सूचना केली. त्यानंतर पीडित माजी सैनिक बंडू मत्ते यांनी वणी पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दिली. ऑनलाईन ठगीबाबतची तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी पुढील तपासकामी प्रकरण सायबर सेलकडे पाठविल्याची माहिती आहे.
ऑनलाईन ठगांपासून सावधान
केवायसी करायचे आहे, लॉटरी लागली, कॅशबॅक, एटीएम बंद झाले, इन्स्टन्ट लोन, क्रेडिट कार्ड देतो अशी बतावणी करून ऑनलाईन फसवणूक केली जाते. ऑनलाईन वस्तू खरेदी करताना अनोळखी वेबसाईटवरून खरेदी करणे टाळावे. कोणत्याही व्यक्तीला आपले फोनपे, गूगल पे क्यूआर कोड, यूपीआय आयडी, एटीएम कार्डवरील नंबर, सिव्हीवही, ओटीपी, पासवर्ड सांगू नये. तसेच एनीडेस्क सारखे कोणतेही ऍप्लिकेशन डाउनलोड करू नये. बँकेतून पैसे काढल्याची माहिती मिळताच तात्काळ बँकेशी व पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.
हे देखील वाचा:
Comments are closed.