पुस्तक परिचय: बहुआयामी कार्यकर्ता अरुण कापटे

"बहुआयामी कार्यकर्ता अरुण कापटे" हा स्मृतिग्रंथ प्रकाशित

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: एखाद्या चळवळीतील कार्यकर्त्याचं जाणं ही चळवळीसाठी अपरिमित हानी असते. परिवाराची आणि समाजाची आणि असते. असाच एक कार्यकर्ता म्हणजे स्मृतिशेष अरुण कापटे. कोरोनाकाळात त्यांच्या जाण्याने मराठा सेवा संघ आणि बहुजन चळवळीत एक पोकळी निर्माण झाली. ही पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. त्यांच्या स्मृतींना उजाळा देत “बहुआयामी कार्यकर्ता अरुण कापटे” हा स्मृतिग्रंथ प्रकाशित झाला. मराठा सेवा संघ चंद्रपूर शाखेने या स्मृतिग्रंथाची प्रथमावृत्ती ५ नोव्हेंबर 2021ला काढली. या दिवशी महात्मा बळीराजा यांचा स्मृतिदिन होता, तर अरुण कापटे यांचा जन्मदिवस.

या स्मृतिग्रंथाचं संकलन मराठा सेवा संघ चळवळीतील कार्यकर्ते संजय गोडे यांनी केलं. स्मृतिग्रंथ संपादनासाठी प्रशांत गोखरे आणि प्रा. डॉ. संजीव कोंडेकर यांनी विशेष परिश्रम घेतलेत. सातारा येथील पुलकेशी राकेश साळुंखे यांनी आकर्षक असं मुखपृष्ठ तयार केलं. चित्र चंद्रपूर येथील सुदर्शन बारापात्रे यांनी काढलं आहे. तर मुद्रण कोल्हापूर येथील भारती मुद्रणालयानं केलं आहे. प्रकाशन संस्थेची भावना चंद्रपूर येथील प्रशांत गोखरे यांनी मांडली. भूमिका संजय गोडे यांची तर संपादकीय मनोगत प्रशांत गोखरे आणि प्रा. डॉ. संजीव कोंडेकर यांचं आहे. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष एड. पुरुषोत्तम खेडेकर यांची या स्मृतिग्रंथास प्रस्तावना आहे. त्यांनी अरुण कापटे यांच्यासोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे.

शिवधर्म संसद सदस्य देवानंद कापसे यांनी शोधलेला आणि सर्वांगाने पैलू पाडलेला हा अगणित कॅरेटचा अस्सल हिरा मराठा सेवा संघाने गमावला असल्याचं एड. पुरुषोत्तम खेडेकर आपल्या प्रस्तावनेत म्हणतात. एड. खेडेकर चळवळीतील छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यापासून मोठ्या पदाधिकाऱ्यांपर्यंत सारखाच स्नेह ठेवतात. कार्यकर्त्यांच्या ख्यालीखुशालीपासून इत्यंभूत माहिती ठेवतात. ही प्रस्तावना वाचताना एड. खेडेकर आणि अरुण कापटे परिवाराशी असलेले त्यांचे स्नेहबंध हळूहळू उलगडत जातात. अरुण कापटे, त्यांच्या पत्नी सरस्वती आणि लेकरं आकांक्षा आणि समीक्षा यांच्याशी असलेलं नातं आदी सर्व काही प्रस्तावनेत आलं आहे. तब्बल 28 लेख या स्मृतिग्रंथात आहेत.

शिवधर्म समन्वयक देवानंद कापसे हे वणी तालुक्यातील मुर्धोनी गावचे. सेवानिवृत्तीनंतर मुर्धोनी या गावातच ते स्थायिक झालेत. ते या स्मृतिग्रंथात अरुण कापटे यांच्यावर भरभरून लिहितात. ते म्हणतात की, अरुण कापटे हे विचारांचे पाईक होते. एकदा हातात झेंडा घेतल्यानंतर त्यांनी कधी खाली ठेवला नाही. अरुण कापटे यांच्यासोबत झालेल्या भेटीवर आणि चर्चांवर कापसे यांनी विशेष प्रकाश टाकला.

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील साहित्यिक तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक ना. गो. थुटे हे अरुण कापटे यांच्या विविध पैलूंवर चर्चा करतात. अरुण कापटे यांच्या बालपणाचा, व्यवसायाचा, चळवळीतील सहभागाचा आणि अन्य विविध घटनांचा आढावा ते घेतात. चंद्रपूर येथील मराठा सेवा संघाचे पदाधिकारी सुधाकर खरवडे हे अरुण कापटे यांच्या पहिल्या भेटीच्या आठवणींना उजाळा देतात. त्यांच्या रूपात एक चांगला कार्यकर्ता मिळाल्याचं समाधानही व्यक्त करतात. अरुण कापटे यांचे सहकारी शिवसेवक प्रशांत गोखरे हे अरुण कापटे यांच्यासोबत केलेल्या अनेक कार्यक्रमांवर चर्चा करतात. ते एक उत्कृष्ट कवी, गीतकार, संगीतकार आणि गायक कलावंत होते.

मराठा सेवा संघ, शिवराज्य, संभाजी ब्रिगेड, शिवधर्म प्रचार-प्रसारासाठी कापटे यांनी दिलेल्या योगदानाचा आवर्जून उल्लेख करतात. वर्धा येथील मराठा सेवा संघ पदाधिकारी, गायक कलावंत तथा संगीतकार सुधीर गिऱ्हे अरुण कापटे यांचा “ऊर्जावान शिलेदार” म्हणून गौरव करतात. कुटुंबवत्सल, निखळ मैत्री जपणारा, वैचारिक बैठक पक्की असणारा एक बहुआयामी कार्यकर्ता अरुण कापटे असल्याचं ते आवर्जून म्हणतात. राजकुमार बोबडे हे अरुण कापटे यांचे मार्डी येथील तारुण्यातील सहकारी. रक्ताच्याही पलीकडचं नातं त्यांनी कसं जोपासलं, याचा उल्लेख ते करतात. तसेच त्यांनी शिवणकाम शिकवल्याबद्दल आणि एल. आय. सी. व्यवसायात आणल्याबद्दल बोबडे कृतज्ञताही व्यक्त करतात.

अरुण कापटे यांची मोठी मुलगी समीक्षा हिचा “पप्पाजी मम्मी झाले अन् आता मम्मी पप्पाजी” हा लेख हृदय हेलावून टाकणारा असाच आहे. वडील, आई आणि या दोघी बहिणींचा प्रेमाचा चौकोन समीक्षाने रेखाटला. समीक्षाची आई नोकरीमुळे या दोन्ही लेकरांना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हत्या. तेव्हा अरुण कापटे यांनी या दोन्ही लेकरांचा आई-वडील या दोन्ही भूमिकांमधून कसा सांभाळ केला ते समीक्षा सांगते. आपल्या वडलांचा म्हणजेच अरुण कापटे यांचा वैचारिक वारसा पुढे चालवण्याचं आश्वासनही समीक्षा आपल्या लेखातून देते. मारेगाव येथील पत्रकार तथा मराठा सेवा संघ पदाधिकारी ज्योतिबा पोटे हे अरुण कापटे यांचं “उत्तम संघटक” म्हणून कौतुक करतात.

त्यांच्यातील संघटनकौशल्याचा, कार्यकर्त्याचा आणि कलावंताचा पोटे ऊहापोह करतात. वरोरा येथील संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी चंद्रशेखर झाडे अरुण कापटे यांना “चळवळीतील वाटाड्या” म्हणून संबोधतात. कापटे यांनी अनेकांना चळवळीची वाट दाखविली. चळवळीत संधी दिली. त्यांनी अनेकांना शिवधर्माच्या विज्ञानवादी, विवेकवादी आणि मानवतावादी मार्गावरून चालायला कसे प्रोत्साहित केले यावर झाडे चर्चा करतात. मराठा सेवा संघातील केंद्रीय पदाधिकारी प्रा. दिलीप चौधरी अरुण कापटे यांना एक “हरहुन्नरी कार्यकर्ता मित्र” मानायचे. कापटे एकाहून एक सरस गीत लिहीत. तसेच आपल्या खड्या; पण मधुर आवाजात गाऊनही दाखवत.

कापटे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी कलापथकसदृश भजनी मंडळ तयार केलं होतं. त्यांनी 12 जानेवारीला सिंदखेडराजा येथे जेवणाचा स्टॉल लावला होता. पुस्तकांचंही दुकान थाटलं होतं. अशा कितीतरी आठवणी प्रा. चौधरी आपल्या लेखातून मांडतात. “सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता” या विचारांवर चालणारे कार्यकर्ता अरुण कापटे असल्याचं विनोद थेरे आपल्या लेखातून म्हणतात. ते “चळवळीला जीव लावणारे अनुयायी” असल्याचा अनुभव संभाजी ब्रिगेड चंद्रपूर-गडचिरोली विभागीय अध्यक्ष थेरे यांनी घेतला.

नवनवीन कार्यकर्त्यांना संघटीत करून त्यांना चळवळीत आणण्याचं त्यांचं कौशल्य वाखाणण्यासारखं असल्याचं थेरे म्हणतात. केळापूर मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष विजय गोडे कापटे यांना “मोठ्या दिलाचा माणूस” मानायचे. सेवाभावी वृत्तीचा, निरपेक्ष कार्याचा आणि शुद्ध विचारांचा वसा कापटे यांनी घेतल्याचं गोडे नमूद करतात. विलास मोहूर्ले हे कापटे यांचे टेलरिंग व्यवसायातले आरंभापासूनच सहकारी होते. टेलरिंग काम आणि शिक्षण यांचा समतोल कापटे कसे सांभाळत याचा आढावा आपल्या छोटेखानी लेखातून मोहूर्ले यांनी घेतला.

अरुण कापटे यांची छोटी मुलगी आकांक्षा हिच्यासाठी तिच्या वडलांसोबतचा प्रत्येक क्षण सोनेरी होता. बाप-लेकीच्या नात्याची सुंदर गुंफण आकांक्षाने आपल्या “सोनेरी क्षण आठवताना” या लेखातून केली आहे. अल्लड बालपणातील आकांक्षासाठी तिथे वडील तिचे मित्र, वडील आणि आई होते.

तिला खेळवणे, भरवणे, शाळेत पोहोचवून देणे अशा कितीतरी सोनेरी आठवणी आकांक्षाने जपून ठेवल्या आहेत. अरुण कापटे यांचे रोशन जोगे हे भाचे. ते कापटे यांच्याच घरी वाढले, शिकले आणि नोकरीला लागले. ते सध्या चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत आहेत. ते आपल्या अरुणमामाबद्दल आजही कृतज्ञता व्यक्त करतात. वरोरा येथील शिवधर्माचे कृतिशील पाईक तथा शिक्षक परिषदेचे पदाधिकारी रामचंद्र सालेकर अरुण कापटे यांना मार्गदर्शक मानतात.

चळवळीतील कार्यकर्त्यांना ते छोट्या-मोठ्या बाबींवर मार्गदर्शन करायचे. जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे विदर्भ संघटक तथा वणीतील ग्रंथविक्रेते दत्ता डोहे आरंभाला मराठा सेवा संघाचा थोडक्यात इतिहास मांडतात. याच विचारांवर अरुण कापटे कसे चालले तेही डोहे आपल्या लेखातून सांगतात. तसेच त्यांच्यासोबतच्या काही आठवणींना डोहे उजाळा देतात. वणीतील अरुण पाटील हे कापटे यांचे जवळचे मित्र. ते कापटे यांची व्यावसायिक कारकीर्द स्पष्ट करतात. टेलरिंगचे काम ते रियल इस्टेटमध्ये त्यांनी घेतलेल्या परिश्रमाची चर्चा करतात.

मारेगाव येथील मराठा सेवा संघाचे पदाधिकारी तथा व्यावसायिक अनामिक बोढे हे अरुण कापटे यांचा “जिवलग दोस्त” म्हणून परिचय करून देतात. अज्ञान, अंधश्रद्धा आणि प्रचंड गरिबी असलेल्या समाजात अरुण कापटे यांचा जन्म झाला. तरीही कापटे यांनी या सर्वांवर मात करीत एक नवा आदर्श समाजासमोर ठेवल्याचं बोढे म्हणतात.

अरुण कापटे यांच्या पत्नी सरस्वती आपल्या लेखातून त्यांचा “सोन्याचा संसार” मांडतात. त्या प्रमाणिकपणे मान्य करतात की, त्यांनी लेकरांना केवळ जन्म दिला. मात्र त्यांच्या पतींनी या लेकरांना माय-बापाच्या मायेनं सांभाळलं. जपलं. ते जसे चांगले पती होते, तसेच ते एक चांगले मित्रदेखील होते हे सरस्वती सांगतात. अरुण कापटे यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतरच्या थरारक प्रवासाचे वर्णन सरस्वती आपल्या लेखातून करतात. त्यांचा कुटुंबाप्रती असलेला जिव्हाळा, कर्तव्य आणि जबाबदारी हेही सरस्वती यांनी मांडलं आहे. अरुण कापटे यांना कोरोना झाल्यानंतरचा क्षण न् क्षण सरस्वती यांनी मांडला आहे. अरुण कापटे यांचे शालेय जीवनातले मित्र सुधीर पिंपळकर सध्या मुंबई येथे कार्यरत आहेत.

ते आपला अनुभव सांगताना म्हणतात की संपर्कात आलेल्या सर्वांना मदत करणं हा कापटे यांचा स्वभाव होता. त्यांनी मैत्रीचं नातं प्रामाणिकपणे जोपासलं. सध्या वर्धा येथे कार्यरत असलेले कापटे यांचे शालेय जीवनातले मित्र गणेश खांदनकर आपल्या शालेय जीवनातले त्यांच्यासोबतचे अनुभव कथन करतात. कापटे यांची वाचनाची आवड आणि त्यांच्या जगण्यातले विविध संघर्ष यावर खांदनकर चर्चा करतात. वरोरा येथील आनंदनिकेतन कृषी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक राहुल तायडे हे कापटे यांचा “शिवसेवक ते राजकीय प्रतिनिधी” असा प्रवास उलगडतात.

कापटे यांचं संघटनकौशल्य, लोकसंग्रह, ग्रामीण भागाची असलेली जन्मजात नाळ, कष्टाळूपणा, उपजत साधेपणा, नम्रता, समाजाप्रती असलेली तळमळ अशा अनेक गुणांमुळे ते सगळ्यांच्या गळ्यातले ताईत बनल्याचं तायडे सांगतात. झरी तालुक्यातील मुकुटबन येथील शिक्षक नेताजी पारखी म्हणतात की, कापटे यांना नवनवीन माणसं जोडण्याचा छंद होता. अरुण कापटे हे प्रयोगशील होते. त्यांनी अनेक सामाजिक आणि व्यावसायिक प्रयोग करून पाहिलेत. सामाजिक प्रयोगांमध्ये त्यांना बर्‍यापैकी यशही मिळालं.

व्यवसायिक प्रयोगांमध्ये मात्र ते अनेकदा फसलेत. त्यांना अनेकदा आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले. सध्या पुणे येथे स्थायिक झालेले संभाजी ब्रिगेड यवतमाळ जिल्ह्याचे माजी कार्याध्यक्ष शेखर भोरे यांनी अरुण कापटे यांच्यामध्ये एक “निस्वार्थ सहकारी” पाहिला. त्यांच्या जाण्यामुळे संघटनेत निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी असल्याचं भोरे म्हणतात. सध्या वरोरा येथे स्थायिक झालेले बबन लोडे हे त्यांच्या अनुभवातील अरूण कापटे सांगतात. ते कापटे यांचे टेलरिंगच्या दिवसांपासूनचे मित्र आणि सहकारी होते. यांच्यासह अनेकांना कापटे कसे विविध प्रकारे मदत करायचे हे ते स्पष्ट करतात. तसेच त्यांच्यामुळे वैचारिक परिवर्तन कसं झालं तेही सांगतात.

सी. आय. एस. एफ.मधून निवृत्त झालेले आणि सध्या राळेगाव येथे स्थायिक झालेले विजय देशमुख हे कापटे यांचे मित्र. सुमारे दोन दशकांपूर्वी यवतमाळला त्यांची भेट झाली होती. त्यानंतरच्या भेटीगाठी, चर्चा यावर देशमुख भाष्य करतात. भविष्यात कापटे यांच्यासोबत शिवसेवक म्हणून कार्य करण्याची देशमुख यांची इच्छा होती. अरुण कापटे यांचे मित्र आणि “बहुआयामी कार्यकर्ता” या स्मृतिग्रंथाचे संकलक संजय गोडे यांच्या प्रदीर्घ लेखाने ग्रंथाची सांगता होते. अरुण कापटे यांच्या निमित्ताने गोडे हे चळवळीचा आढावा घेतात. “तो दिवस” या उपशीर्षकाखाली अरुण कापटे यांच्या जाण्याचा प्रसंग गोडे आपल्या लेखनातून उभा करतात.

परिवारातील एक सदस्य गेल्याची खंत यातून व्यक्त होते. “पोकळी आणि पश्चातापाचे सत्र” या उपशीर्षकाप्रमाणेच विषयाची मांडणी गोडे यांनी केली. “काऊंटडाऊन” आणि “क्लायमॅक्स” या उपशीर्षकांखाली कापटे यांचा कोरोनाप्रवास गोडे यांनी मांडला. “अखेरचा निरोप” या उपशीर्षकाखाली लिहिताना गोडे यांच्या काळजाला बसलेले हादरे स्पष्ट जाणवतात. “पहिली भेट” या उपशीर्षकातून गोडे फ्लॅशबॅकमध्ये जातात. कापटे यांची “मराठा सेवा संघ पार्श्वभूमी” सांगत ते “वणीच्या टीममध्ये सक्रिय” कसे होते,

हे सांगायला गोडे विसरत नाही. सन 2004 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कापटे यांनी अनेकांना प्रभावित केलं होतं. याच वर्षी झालेल्या वर्धा आणि वणी येथील शिवधर्म परिषदेतील कापटे यांच्या सक्रिय सहभागावर गोडे भाष्य करतात. संभाजी ब्रिगेड शिबिर आणि जिल्हा अधिवेशन, सन 2005 ची जिजाऊ रथयात्रा आणि या रथयात्रेचा सिंदखेडराजा येथे झालेला समारोप यातील अरूण कापटे यांचा सक्रिय सहभाग संजय गोडे नोंदवितात. याच वर्षात हरियाणा येथे झालेल्या मराठा मिलन समारोहातील अरुण कापटे यांच्यासोबतचे अनुभव गोडे यांनी थोड्या विस्ताराने सांगितले आहेत.

एकाच चळवळीतील कार्यकर्ते असलेले अरुण आणि संजय हे घनिष्ट मित्रदेखील होते. गोडे यांच्या विवाहापासून त्यांचा मुलगा मैत्रेय उर्फ विरोचन याच्या जन्मापर्यंत कापटे परिवाराचं अतुलनीय योगदान राहीलं. गोडे यांच्या वडलांचा 6 जानेवारी 2007 ला मृत्यू झाला. 19 फेब्रुवारी 2006ला त्यांची बहीण भावना यांच्या पतीचं निधन झालं. याही कठीण परिस्थितींमध्ये अरुण कापटे आणि त्यांचा परिवार गोडे परिवाराच्या पाठीशी उभा होता. यासाठी गोडे कृतज्ञता व्यक्त करतात. सन 2007 साली गोडे यांच्या वडलांचा आदरांजली कार्यक्रम झाला. दुसऱ्याच दिवशी वणी येथे शिवधर्म परिषद झाली. या कार्यक्रमांमधील कापटे यांचे सहकार्य संजय गोडे विसरू शकत नाहीत. तुमसर येथील शिवविवाह असो की झरी तालुक्यातील मांगली येथील सामूहिक विवाह मेळावा असो अरुण कापटे यांनी यात खूप परिश्रम घेतलेत.

अरुण कापटे या कार्यकर्त्यांचं स्वतःचं घर बांधून झालं ते सन 2008 मध्ये. या गृहप्रवेश सोहळ्याला एड. पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासह अख्ख्या महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सन 2010मध्ये वरोरा येथे संभाजी ब्रिगेडचं जिल्हा अधिवेशन झालं. सन 2011मध्ये चंद्रपूर येथे ग्रामजागर यात्रा निघाली. सन 2012 मध्ये चंद्रपूर येथे झालेल्या साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी निघाली. सन 2019 मध्ये सिंदखेडराजा येथे कीर्तनकार कार्यशाळा झाली. या सर्व उपक्रमांमध्ये अरुण कापटे हे नेहमीच सक्रिय राहिले होते. थोडक्यात अरुण कापटे यांच्या स्मृतिग्रंथाचं “बहुआयामी कार्यकर्ता अरुण कापटे” हे नाव सार्थ आहे. त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न सर्व लेखकांनी केला आहे.

कापटे हे हरहुन्नरी होते. लोकसंग्रह करण्याचं एक निराळच तंत्र त्यांच्याजवळ होतं. परिवार, समाज आणि चळवळीशी ते सदैव एकनिष्ठ राहिलेत. व्यवसाय, राजकारण, समाजकारण, चळवळ या सर्व क्षेत्रांमध्ये ते प्रमाणिक राहिलेत. त्यांचं जाणं म्हणजे परिवाराला, चळवळीला आणि समाजाला एक मोठा धक्काच आहे. यातून अजूनही कुणी सावरलेलं नाही. त्यांच्या या सर्व आठवणी, त्यांचं कार्य जपता यावं म्हणून मराठा सेवा संघ चंद्रपूर शाखेनं “बहुआयामी कार्यकर्ता अरुण कापटे” हा स्मृतिग्रंथ प्रकाशित केला. संजय बोटरे, द्वारा मराठा सेवा संघ नागरी सहकारी पतसंस्था, तुकुम, चंद्रपूर हे या स्मृतिग्रंथाचे प्रमुख वितरक आहेत. त्यांचा 90 96 68 49 15 हा मोबाईल नंबर आहे. आपण सर्वांनी हा स्मृतिग्रंथ अवश्य वाचावा. चळवळीतील या कार्यकर्त्यांचं जीवन समजून घ्यावं, ही नम्र विनंती. स्मृतिशेष अरुण कापटे यांना विनम्र आदरांजली.

सुनील इंदुवामन ठाकरे
वणी, जिल्हा यतमाळ

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.