सुरेश पाचभाई, बोटोणी: बुरांडा (ख) येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व जि प सदस्य अनिल पाटील देरकर यांच्या हस्ते आज दुपारी भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. लवकरच या उपकेंद्राच्या कामाला सुरूवात होणार आहे. येत्या 6 महिन्यात हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा असून या उपकेंद्रात बुरांडा, खडकी, खापरी, घोडदरा, म्हैसदोळका हे पाच गावांचा समावेश असणार आहे.
बुरांडा (ख) हे गाव आदिवासी बहुल गाव आहे. हे गाव 17 किलोमीटर अंतरावर असलेल्या वेगाव पीएचसी अंतर्गत येते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना शस्त्रक्रिया तसेच इतर आरोग्य सेवेसाठी वेगाव येथे जावे लागत होते. मात्र अंतर अधिक असल्याने व या मार्गाने रहदारी नसल्याने रुग्णांना येथे जाण्यात हाल अपेष्टा सहन करून जावे लागायचे व यात वेळही जायचा.
गेल्या काही काळापासून बुरांडा येथे आरोग्य उपकेंद्र द्यावे अशी परिसरातील ग्रामस्थांची मागणी होती. अखेर बुरांडा व नुरजहा नगर येथील खाली जागा उपकेंद्रासाठी देण्यात आली. जागेचा प्रश्न सुटल्याने बांधकामासाठीही हालचाली सुरू होत्या. अखेर या कामासाठी 1 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजुर झाला. येत्या 6 महिन्यात उपकेद्र सुरू होण्याची शक्यता आहे.
भूमिपूजना कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना देठे, डॉ. कोडापे वेगाव पीएसची, ग्रामसेवक एस के काकडे, सरपंच भास्कर आत्राम, संजय शिंदे, शंकर लालसरे, मारोती पाचभाई, बबन जोगी, सचिन वासेकर, अजय वासेकर, तुकाराम बेर्डे, भारत आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
हे देखील वाचा:
वणीच्या इतिहासातील सर्वात मोठी अतिक्रमण मोहीम व सर्वात मोठी पाणीटंचाई
Comments are closed.