तालुका प्रतिनिधी, मारेगाव: घरी डीजे लावून डान्स करू असे आमिष दाखवून एका 5 वर्षीय चिमुकलीवर एका नराधमाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. तालुक्यातील एका गावात घडलेल्या या घटनेने संपूर्ण मारेगाव तालुका हादरला आहे. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी संध्याकाळी आरोपी नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहे. त्याच्यावर आयपीसी, पोस्को, ऍट्रोसिटीसह विविध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण दाबण्याचा पुरेपुर प्रयत्न करण्यात आला होता. मात्र वणीतील एका हॉस्पिटलच्या सजगतेमुळे आरोपीचे मनसुबे उधळून निघाले.
सविस्तर वृत्त असे की पीडिता ही तालुक्यातील एका गावात तिच्या आई वडिलांसह राहते. तिचे पालक मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गुरुवारी दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सकाळी चिमुकलीचे पालक कामासाठी घरून निघाले. संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास चिमुकली ही तिच्या एका मैत्रिणीसह खेळत असताना आरोपी नीलेश राजू टोंगे (वय 28) रा. किन्हाळा तालुका मारेगाव याच्या घराजवळ गेली होती. तेव्हा आरोपीने घरात डीजे लावून डान्स करू असे सांगून चिमुकलीला घरी बोलावले. त्याच्या आमिषाला बळी पडून चिमुकली आरोपीच्या घरी गेली. घरी आरोपीने तिच्यावर अत्याचार केला.
प्रकारानंतर घरी आल्यावर चिमुकलीला त्रास होऊ लागला. त्यामुळे तिने आईला संपूर्ण घटना सांगितली. तिने लगेच ही माहिती चिमुकलीच्या वडिलांना सांगितली. झालेला प्रकार माहित झाल्याने पीडितेचे वडिल घाबरून गेले. त्यांनी याबाबत विचारणा केली असता एक मध्यस्थी प्रकरण रफादफा करण्याच्या मागे लागला. तर चिमुकलीला त्रास वाढत असल्याने तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्याचे ठरले.
प्रकरण दडपण्याचा प्रयत्न फसला
शनिवारी दिनांक 12 फेब्रुवारी म्हणजे घटनेच्या दोन दिवसानंतर दुपारी चिमुकलीला वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांना हा गंभीर प्रकार तात्काळ लक्षात आला. त्यांनी चिमुकलीला वणीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. पीडितेला ग्रामीण रुग्णालयात नेल्यावर हे संपर्ण प्रकरण समोर आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार हे रुग्णालयात दाखल झाले.
एसडीपीओ यांना प्रकरण कळल्यावर त्यांनी ताबडतोब मारेगाव पोलिसांना नराधमाच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले. पोलिसांचे पथक तातडीने किन्हाळा येथे गेले व त्यांनी आरोपी नीलेश राजू टोंगे (वय 28) याला अटक केली. मारेगाव पोलिसांनी आरोपीवर भादंविच्या कलम 376 (अ) (ब), सहकलम पोस्को व ऍट्रोसिटीच्या विविध कलमांतर्ग गुन्हा दाखल केला. रात्री उशिरा या घटनेची तालुक्यात माहिती मिळताच संपूर्ण तालुक्यात संताप पसरला. प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार करीत आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.