रवि ढुमणे, वणी: जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या बदल्या शासनाने नाना तऱ्हेच्या अटी शर्ती घालत रेंगाळत ठेवल्या आहेत. गेल्या आठ महिन्यांपासून बदलीसाठी ऑनलाइन अर्ज भरून जीवाचे रान करणाऱ्या शिक्षकांच्या भावनांशी खेळत शासनाने बदलीचे भिजत घोंगडे ठेवले आहै. सत्र संपताच बदली करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा परिषद शिक्षकांची बदली प्रक्रिया सध्या नवनवीन वळणावर आहे. गेल्या आठ महिन्यांपासून शिक्षकांनी बदली होईल या आशेने ऑनलाईन अर्ज भरून सदर प्रक्रिया पूर्ण केली आहे. या प्रक्रियेचे साईट बंद तर कधी सर्व्हर बंद अशा कुरबुरीत शासनाच्या पोर्टलवर अर्ज सादर केलेत.
संवर्ग 1 व 2 ची अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली त्यानंतर 3 व 4 ची सुद्धा झाली. गेली कित्येक वर्षे लांब टप्याच्या शाळेत अध्यापन करीत असणाऱ्या शिक्षकांना कुठेतरी आशेचा किरण दिसला. बदली आता होईल, आठ दिवसांनी होईल या आशेवर सामान्य शिक्षक टक लावून बघत होता. मात्र ग्रामविकास मंत्रालयाने वेळकाढू धोरण अवलंबित बदली प्रक्रिया जणू खोळंबत ठेवली.
बघता बघता दिवाळी आली. या सुट्यांमध्ये बदली होईल अशी आशा बाळगून असलेला शिक्षक जाम खुश होता. मात्र शासनाने यातही त्रुटी काढत परत ही प्रक्रिया लांबविण्याचा प्रयत्न केला. न्यायालयात या संबंधीचे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. न्यायालयाने बदली संदर्भात निर्णय दिला आणि बदलीप्राप्त शिक्षकांना परत बदली होण्याची चिन्हे दिसायला लागली.
बदली अर्ज भरून आठ महिन्यांचा कालावधी लोटून गेला. मात्र यावर शासनाने ठोस निर्णय दिलाच नाही. आजवर पहिल्यांदाच शासनाने अशी भूमिका वठविल्याचे बोलल्या जात आहे. बदली हवी असलेल्या शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे. सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यात बदली हवी असणाऱ्या शिक्षकांनी शासनाच्या विरुद्ध एल्गार पुकारत तीव्र आंदोलन करायला सुरुवात केली आहे.
अनेक ठिकाणी मोर्चे आंदोलने करीत निदर्शने सुद्धा केली आहे. बदली प्राप्त शिक्षकांना त्वरित कार्यामुक्त करण्यात यावे यासाठी शिक्षक संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बदली प्रक्रियेचा अनेक दिशाभूल करणाऱ्या पोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. या पोष्टचा सामान्य शिक्षकांना मानसिक त्रास सुद्धा झाला. परंतु शासनाने यात केवळ शिक्षकांच्या भावनांशी खेल करीत जणू लपंडावच खेळला. या खेळात मात्र नेहमीच कोसो दूर अध्यापन करणारा शिक्षक बळी पडल्याचे बघायला मिळाले.
आता बदली होणार की पुढील सत्रात ही प्रक्रिया आटोपणार याकडे सर्व शिक्षकांचे लक्ष लागले आहे. मात्र जर बदल्या झाल्या नाहीत तर गेल्या आठ महिन्यात झालेला मानसिक व शारीरिक आणि आर्थिक त्रास कसा भरून निघणार हा एक प्रश्न उरतो आहे.