मारेगाव नगरपंचायतीमध्ये पुन्हा रंगले नाट्य, काँग्रेसचा चक्क भाजपला पाठिंबा

चारही सभापती भाजपचे, सेनेला दूर ठेवत काँग्रेसने काढला वचपा.... काँग्रेसचा एक तर सेनेचा एक स्वीकृत नगरसेवक

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव नगरपंचायतमधले धक्कातंत्र व राजकीय नाट्य अद्यापही थांबलेले नाही. झालेल्या स्वीकृत सभासदांची निवडणूक व सभापतीपदाच्या निवडीत याचा प्रत्यय दिसून आला. स्वीकृत नगरसेवकाच्या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार अविरोध तर सेनेचा उमेदवार ईश्वरचिट्ठीने निवडून आला. तर सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या चारही नगरसेवकांना सभापती पद मिळाले आहे. मात्र हे सहजासहजी झाले नाही. यात मोठे राजकीय नाट्य घडून आले. सेनेचा बदला घेण्यासाठी काँग्रेसने चक्क भाजपला पाठिंबा दिला. मात्र या सर्व घडामोडींमध्ये सेना तर पदपासून दूर राहिली मात्र सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसच्या हाती धुपाटनेच आले.

मारेगाव नगरपंचायतची सभापती निवडीसाठी सोमवारी दि. 21 फेब्रुवारी रोजी विशेष सभा बोलवण्यात आली होती. या निवडणुकीतही काहीतरी अनपेक्षीत घडणार अशी चर्चा आधीच वर्तविण्यात येत होती. ती तंतोतंत खरी ठरली. सभापतीपदाच्या निवडणुकीत बांधकाम सभापतीपदी राहुल राठोड, महिला व बालकल्याण सभापती पदी हर्षा अनुप महाकुलकर, वैभव पवार – पाणीपुरवठा सभापती, सुशीला डोमाजी भादीकर- स्वच्छता व आरोग्य सभापती यांची निवड करण्यात आली.

भाजपच्या प्रामाणिकतेचा विजय – रवि बेलुरकर, भाजप
नगराध्यक्षपदासाठी सेनेच्या मागणीमुळे आम्ही प्रामाणिकपणे पाठिंबा देत मदत केली. मात्र उपाध्यक्षपदी सेनेने दगाबाजी केली. त्याला आम्ही प्रामाणिकतेने उत्तर देत हिशेब बरोबर केला आहे. आज आमच्या पक्षाचे सर्व सभापती झाले आहे. हा आमच्या पक्षाच्या प्रामाणिकतेचा विजय तर दगाबाजीचा पराभव आहे.
– रवि बेलूरकर (प्रभारी, नगरपंचायत निवडणूक, भाजप)

नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेस पक्षाला शह देत भाजपच्या मदतीने अध्यक्षपद बळकावले. मात्र उपाध्यक्ष निवडणुकीमध्ये भाजपाचा गेम करण्याचा प्रयत्न केला गेला. त्याची पुरेपूर परतफेड करण्याचा प्लान भाजपने केला. त्यामुळे सभापती निवडीच्या वेळी भाजप चक्क काँग्रेसची मदत घेत मास्टरस्टोक मारला. सभापतीपदासाठी भाजपच्या उमेदवारांना काँग्रेसने पाठिंबा दिला. त्यामुळे सभापती निवडणूक बिनविरोध झाली व चारही सभापती भाजपाचेच बनले.

भाजपला साथ देत काँग्रेसने काढला वचपा
आज सभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या सभासदांना काँग्रेसच्या सभासदांनी सूचक आणि अनुमोदन दिले. अख्या देशात एकमेकांच्या विरोधात असलेले भाजप आणि काँग्रेस मारेगाव शहरात मात्र एकत्र आले. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या सेनेने काँग्रेसचा गेम केल्याने काँग्रेस याचा वचपा काढणार हे निश्चित होते. शिवसेनेला पदापासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने भाजपला मदत करत त्याची परतफेड केली.

भाजपनेही काढला वचपा
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने सेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे सेनेचा नगराध्यक्ष झाला. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेना भाजपला पाठिंबा देणार होती. मात्र ऐनवेळी सेनेने कुटनिती वापरली. भाजपला उपाध्यक्ष पदापासून दूर ठेवण्यासाठी चक्क नगराध्यक्षच मतदानाच्या वेळी गैरहजर राहिले. त्यामुळे प्रकरण इश्वरचिठ्ठीवर आले. मात्र भाजपला ईश्वरचिठ्ठने तारले व भाजपचा उपाध्यक्ष बनला. हा वचपा भाजपने काँग्रेसची मदत घेत आज काढला व एकही सभापतीपद स्वत:कडे राखत सेनेची पाटी कोरी ठेवली.

काँग्रेस ठरला बाजीकर पण…. हाती धुपाटणेच !
सेनेने नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसचा गेम केला तर उपाध्यक्षपदासाठी भाजपचा गेम केला. त्यामुळे दोन्हीही पक्ष याचा वचपा काढण्याच्या संधीत होते. त्यानुसार सेनेला दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने भाजपची मदत केली. म्हणतात की ‘हार कर जितनेवालो को बाजीगर कहते है’ त्यामुळे काँग्रेस हरूनही बाजीगर बनला. मात्र या सर्व घडामोडीत सर्वात मोठा पक्ष ठरूनही काँग्रेसच्या हाती धुपाटणेच आले. तर मलाई भाजपच्या वाटेला आली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.