…आणि खुद्द नगराध्यक्षच राहायचे गैरहजर: सत्ता येऊनही तोटा झालेली टर्म

वारे नगररपालिकेचे भाग 8 - सन 2006 ते 2011, वणीच्या इतिहासाला कलंकीत करणा-या दोन घटना...

जब्बार चीनी, वणी: 2006 मध्ये नगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आली. मात्र सत्ता आल्यावर फायदा होण्याऐवजी उलट पक्षाला तोटाच झाला. स्थानिक प्रश्नांबाबत लोकांची नाराजी, सतत गैरहजर राहणारे नगराध्यक्ष, पुन्हा उद्भवलेली पाणी टंचाई, ठेकेदारांची केलेली पाठराखण यामुळे 2006 चा कार्यकाळ चांगलाच गाजला.  याशिवाय शेतकरी गोळीबार, पुतळा विटंबन यासारख्या वणीच्या सांस्कृतिक वारशाला धक्का लावणा-या घटनाही याच काळात घडल्या. आजच्या वारेनगरालिकेच्या भागात आपण 2006-11 या कार्यकाळ बघणार आहोत.  

वारे नगरपालिकेचे भाग 8  (2006 ते 2011)
2005 मध्ये पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या साधना गोहोकर या निवडून आल्या. हा कार्यकाळ जरी एक दीड वर्षांचा असला तरी पहिल्यांदाच राष्ट्रवादीची नगरपालिकेत सत्ता आली होती. या काळात राष्ट्रवादी काँग्रेसने स्थानिक राजकारणात आपले पाय रोवले. याच काळात शहरात राष्ट्रवादी काँग्रेस बळकट झाली. त्याच्या परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसला 2006 च्या निवडणुकीत पाहायला मिळाला.

19 नोव्हेंबर 2006 ला नगरपालिकेची निवडणूक झाली. या निवडणुकीत प्रभाग पद्धती व थेट नगराध्यक्ष पदाची पद्धत रद्द करण्यात आली. वणीत 25 वार्डांसाठी निवडणूक झाली. यात राष्ट्रवादीने धडाकेबाज विजय मिळवत सर्वाधिक 8 जागा जिंकल्या. शिवसेनेला 5 जागा मिळाल्या. काँग्रेसला 3 तर भाजपला 2 जागांवर समाधान मानावे लागले. अपक्षांनी या निवडणुकीत आपला जलवा दाखवत तब्बल 7 जागा जिंकल्या. विशेष म्हणजे सेनेच्या माधुरी काकडे यांनी इश्वरचिठ्ठीने मिळवलेल्या विजयाची यावेळी चांगलीच चर्चा झाली होती.

2006 च्या निवडणुकीचे विजयी उमेदवार –
प्रवीण ढोके (राकाँ), नंदकिशोर जवळे (भाजप), प्रकाश पिंपळकर (सेना), माधुरी काकडे (सेना), धनराज उर्फ राजू भोंगळे (अपक्ष), राजू तुराणकर (सेना), शारदा काकडे (सेना), सिद्दीक रंगरेज (अपक्ष), दिगंबर पालमवार (भाजप), शाबुजी ज. अब्दुल अजीज (अपक्ष), लक्ष्मी पाटील (राकाँ), डॉ. हेमलता लामगे (राकाँ), राकेश खुराना (राकाँ), दिगंबर चांदेकर (अपक्ष), हाफिज रहेमान (काँग्रेस), यादव सातपुते (राकाँ), ज्योती भादीकर (राकाँ)
निर्मला प्रेमलवार (अपक्ष), संगीता ताराचंद (राकाँ), शंकर झाम (अपक्ष)
मोहम्मद अलताफ (राकाँ), प्रमोद लोणारे (काँग्रेस), किशोर मून (अपक्ष)
श्यामा तोटावार (काँग्रेस), घनश्याम पडोळे (सेना)

काँग्रेसचा दारुण पराभव तर 3 नगराध्यक्षांनाही नाकारले
2006 च्या निवडणुकीत काँग्रेसचे मते आपल्याकडे वळवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी झाली. आधीच्या निवडणुकीत 13 जागा (10+3) जिंकणा-या काँग्रेसला या निवडणुकीत दारूण पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे या निवडणुकीत 3 माजी नगराध्यक्षांना पराभवाचा सामना करावा लागला. गेल्या निवडणुकीत अपक्ष म्हणून थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या शालिनी रासेकर यांना लोकांनी नगरसेवक म्हणूनही नाकारले. तर माजी नगराध्यक्ष आशा टोंगे व कायम आपल्या वार्डातून निवडून येण्याचा रेकॉर्ड असलेले माजी नगराध्यक्ष सुरेश रायपुरे यांनाही या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला.

डिसेंबर 2006 मध्ये नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे 8 तर सेना-भाजप युतीकडे 7 नगरसेवकांचे संख्याबळ होते. ज्यांना अपक्षांची साथ मिळणार त्यांचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होता. यात संजय देरकर यांनी बाजी मारली. त्यांनी 7 नगरसेवकांना आपल्याकडे वळवण्यात यश मिळवले. अपक्ष नगरसेवकांना वळण्यात राकेश खुराना यांचाही मोठा वाटा होता. भाजपमधून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येऊन विजयी झालेल्या डॉ. हेमलता लामगे यांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करण्यात आले. राकेश खुराना हे उपाध्यक्षपदाचे उमेदवार होते. हेमलता लामगे या नगराध्यक्ष तर राकेश खुराना हे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आलेत. यावेळी काँग्रेसने विरोधी बाकावर बसणे पसंत केले.

सेनेची पालिकेत खळखट्याक…
डॉ. हेमलता लामगे यांचा नगराध्यक्ष पदाच्या काळात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. पाणी टंचाईने पुढल्या वर्षीच तोंड वर काढले होते. विविध प्रश्नावर सेनेचे नगरसेवक आक्रमक व्हायचे. 2007 मध्ये तर नगरपालिकेच्या एका सर्वसाधारण सभेत सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांमध्ये हातापायी झाली. यात विरोधी बाकावरील नगरसेवकांनी पालिकेतील 4 खुर्चांची तोडफोडही केली. 2008 साली जलशुद्धीकरणाचे 33 लाख व स्ट्रिट लाईटचे 21 लाख रुपयांचे इलेक्ट्रिकचे बिल थकीत ठेवल्याने चक्क पालिकेचेच इलेक्ट्रिक कनेक्शन कापले होते.

पूर्व नगराध्यक्षांवर गुन्हा दाखल
वरोरा रोड ते महावीर भवन दरम्यानच्या पाईप लाईन बिल घोटाळ्या प्रकरणी
पूर्व नगराध्यक्ष यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला. प्रकरणाच्या तब्बल 5 वर्षांनंतर ही कारवाई करण्यात आली होती. या मुद्दा सेनेच्या एका नगरसेवकाने उपस्थित केला होता. पाईप लाईन न टाकताच खोटे बिल सादर करून बिल काढल्याचा आरोप या नगरसेवकाचा होता. पुढे हे प्रकरण कोर्टात गेले व कोर्टाने पूर्व नगराध्यक्ष यांच्यासह मुख्याधिकारी, अभियंता व ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या प्रकरणाने तेव्हा एकच खळबळ उडाली होती.

वणीत शेतक-यांवरचा गोळीबार
वणीच्या इतिहासातील काळा अध्याय ठरलेला शेतक-यावरचा गोळीबार याच काळात झाला. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाची खरेदी अचानक बंद झाली. त्यामुळे तिथे हजारो गाड्या उभ्या झाल्या. तीन दिवसानंतर दिनांक 8 डिसेंबर 2008 रोजी कापूस खरेदी सुरू झाली. मात्र यावेळी अवघ्या काही गाड्यांतील कापसाची खरेदी करण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतक-यांनी ग्रेडरला चोप दिला. यामुळे वातावरण चिघळल्याने पोलिसांना बोलावण्यात आले. मात्र घटनास्थळी तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामुळे प्रकरण आणखीनच चिघळले व संतप्त शेतक-यांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली.

अचानक झालेल्या दगडफेकीमुळे पोलिसांनी बचावासाठी पळ काढला. तर ग्रेडरने कार्यालयाकडे धाव घेत कार्यालयाचा दरवाजा आतून बंद केला. संतप्त शेतक-यांनी कार्यालयाच्या बाहेर सामानाची प्रचंड नासधूस केली. तर काहींनी परिसरातील 3 दुचाकी व 2 सायकली जाळल्या. शेतकरी हिंसक झाल्याने पोलिसांनी गोळीबार केला. यात दिनेश घुगुल या शेतक-याचा मृत्यू झाला तर 4 शेतकरी जखमी झाले. लाठीचार्जमध्ये 15 शेतकरी जखमी झाले. तर दगडफेकीत 10 पोलीस जखमी झाले होते.


====================================

यादव सातपुते झाले नगराध्यक्ष
जून 2009 मध्ये लामगे यांचा 2.5 वर्षांचा कार्यकाळ समाप्त झाला. पुन्हा नगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली. यावेळी नगराध्यक्षपद ओबीसी राखीव होते. गेल्या टर्ममध्ये सत्ता स्थापन करता न आल्याने शिवसेनेने यावेळी सत्ता स्थापनेसाठी तयारी सुरू केली. त्यासाठी त्यांना अपक्षांची मदत हवी होती. मात्र या वेळीही अपक्षांना आपल्याकडे वळवण्यात सेनेला अपयश आले. 17 जून 2009 रोजी राकाँचे यादव सातपुते व सेना-भाजप युतीचे घनश्याम पडोळे यांच्यात लढत झाली. यात यादव सातपुते हे निवडून आले. तर उपाध्यक्षपदी पुन्हा राकेश खुराना निवडून आले.

सतत गैरहजर राहणारे नगराध्यक्ष
यादव सातपुते यांच्या काळाची तेव्हा चांगलीच चर्चा झाली. यादव सातपुते व राकेश खुराना यांच्या जोडीला तेव्हा कृष्ण पेंद्याची जोडी म्हटले जायचे. अधिकाधिक दिवस यादव सातपुते हे गैरहजर राहायचे. त्यामुळे राकेश खुराना यांच्याकडेच नगराध्यक्षपदाचा प्रभार असायचा. त्यामुळे असा आरोप केला जायचा की राकेश खुराना हेच सर्व नगरपालिकेचा कारभार चालवतात व त्यासाठीच नगराध्यक्ष सुट्टीवर जातात. पाणी प्रश्न, रस्ता, स्वच्छता इत्यादी प्रश्नांवर समाधानकारक तोडगा काढण्यात सत्ताधारी अपयशी ठरले. त्याचा विरोधी पक्षांनी चांगलाच फायदा घेतला. विशेष म्हणजे त्यांना या कामात मीडियाची जोड मिळाली.

नगरपालिकेच्या सत्तेते पडसाद विधानसभा निवडणुकीत
पाणी प्रश्न तसेच नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यात नगरपालिका अपयशी ठरली. यामुळे पालिकेतील राष्ट्रवादीच्या सत्तेबाबत प्रचंड नाराजी पसरली. याच काळात 2009 मध्ये विधानसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीत संजय देरकर यांना पराभव पत्करावा लागला. वणी शहरातील मतदान हे विधानसभेच्या निकालावर प्रभाव पाडते. मात्र शहरातून संजय देरकर यांना कमी मते मिळाली. नगरपालिकेतील भोंगळ कारभार याला कारणीभूत असल्याचा दावा यावेळी अनेक राजकीय विश्लेषकांनी केला होता. पुढे यातून राकेश खुराना यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून फारकत घेत काँग्रेसचा हात धरला.

7 वर्षांनी पुन्हा भीषण पाणीटंचाई
2010 सुरू होताच वणीची जीवनदायीनी निर्गुडा नदी आटायला सुरुवात झाली. त्यामुळे शहरावर पाणी टंचाईचे शहरावर आले. यावर उपाय म्हणून काही टंचाईग्रस्त भागात नवीन पाईपलाईन टाकून ट्युबवेलद्वारा पाणी पुरवठा करण्याचा निर्णय़ पालिकेने घेतला. मात्र ही पाईप लाईन जोडण्याबाबत प्रचंड भेदभाव झाल्याचा आरोप झाला. त्यामुळे नागरिक संतप्त झाले व त्यांनी रस्ता रोको करत टागोर चौकामध्ये भव्य मोर्चा काढला. या पाणी टंचाईचा मनसेने चांगलाच फायदा घेतला. शहरात ठिकठिकाणी मनसेद्वारा टँकरद्वारा पाणी पुरवठा करण्यात आला. याच काळात लोक मध्यरात्रीही टँकर आल्यावर पाणी भरण्यासाठी गर्दी करायचे. 2003 नंतर तब्बल 7 वर्षांनी वणीकरांनी पुन्हा एकदा पाणी टंचाई अनुभवली.

पाणी प्रश्नावर निघालेला वणीकरांचा टागोर चौक येथील मोर्चा

शाळा क्रमांक दोन समोरील गाळा प्रकरण
शाळा क्रमांक 2 समोरील गाळे तयार होऊन बराच काळ लोटला तरीही त्याची हर्रासची प्रक्रिया मात्र पार पडली नव्हती. दरम्यान गाळे हर्रास करून जी अनामत रक्कम प्राप्त होईल तो निधी इतर बिले काढण्यासाठी खर्च करावा, असा ठराव घेण्यात आला. त्याला नगर सेवकांनी आक्षेप घेतला. 2011 मध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्तात गाळे हर्रास झाले. मात्र या गाळ्यामध्ये आरक्षण योग्य प्रकारे नसल्याने गाळे विक्री थांबवावी अशी मागणी करीत अखिल सातोकर यांनी अंगावर डिजेल घेतले होते. गाळे हर्रास झाले. पुढे गाळ्यातून मिळालेला निधी इतर कामात खर्च न करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिले व हा प्रश्न निकाली लागला.

वणीच्या सांस्कृतिक वारशाला कलंकीत घटना
26 जानेवारी 2010 ची रात्र. वणीतील संपूर्ण मान्यवर, नेते, समाजसेवक, अधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने वणीकर एका अवॉर्ड फंक्शनमध्ये बिझी होते. एका स्थानिक पत्रकाराने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रम लोटल्याच्या काही तासानंतरच मध्यरात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. यामुळे वणीकर जनता संतप्त झाली. यावेळी वणीकरांनी ठाणेदरांच्या बदली ऐवजी आरोपींना अटक करण्याची मागणी लावून धरली.

प्रकरणाचा तपास सुरू झाला. मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल याच्या मदतीने दोन संशयीतांना अटक करण्यात आली. त्यातील मुख्य आरोपी हा ज्या पत्रकाराने अवॉर्ड फंक्शन आयोजित केला होता तोच निघाला. ठाणेदारांची बदली या उद्देशाने विटंबना केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले. पुढे काही दिवसांनी आरोपीची जामिनावर सुटका झाली. मात्र जामिन झाल्याच्या अवघ्या काही दिवसातच आरोपीची भर चौकात सकाळी 8 वाजताच्या सुमारास तलवारीने हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता.

क्रमश: 

(2011 ते 2016 च्या काळातील घडामोडी वारे नगरपालिकेच्या पुढच्या भागात)

वारे नगरपालिकेचे या सर्वाधिक लोकप्रिय सिरिजचे जुने भाग खालील लिंकवर

वणीच्या इतिहासातील सर्वात मोठी अतिक्रमण मोहीम व सर्वात मोठी पाणीटंचाई

वारे नगरपालिकेचे भाग 1: वणी नगर पालिकेला 96 वर्षांचा इतिहास

…आणि ईश्वरचिठ्ठीने झाला लढतीचा फैसला… वारे नगरपालिकेचे भाग 2

…आणि हत्याकांडात आले तत्कालीन नगराध्यक्षांचे नाव…. वारे नगरपालिकेचे भाग 3

ऍक्सिडेंटल नगराध्यक्ष… संजय देरकर… वारे नगरपालिकेचे भाग 4

मतदानाला 12 गेले… 12 च परत आले… पण मत मिळाले 11: वारे नगरपालिकेचे भाग 5

वारे नगरपालिकेचे भाग 6: 5 वर्षात झाले तब्बल 5 नगराध्यक्ष

 

Comments are closed.