शाळेत जाणा-या शिक्षकावर काळाचा घाला, ट्रकने चिरडल्याने जागीच मृत्यू

चारगाव जवळ ट्रकची दुचाकीला भीषण धडक

जितेंद्र कोठारी, वणी: सकाळच्या शाळेसाठी वणीहून कुरई येथे जाणा-या शिक्षकाच्या दुचाकीचा चारगाव चौकी जवळ भीषण अपघात झाला. यात चालक असलेले शिक्षक जखमी झाले तर मागे बसलेल्या शिक्षकाला ट्रकने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. आज सकाळी 7.15 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. विद्यार्थीप्रिय शिक्षकाच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे वणी व कुरईमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. 

सविस्तर वृत्त असे की मुळचे ब्राह्मणी येथील प्रशांत बुरांडे (35) हे वणीतील प्रगती नगर येथे राहत होते. ते तालुक्यातील कोरपना रोडवरील कुरई येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. ते रोज कुरईच्याच शाळेत शिक्षक असलेले त्यांचे सहकारी श्रीकांत उपाध्ये ( वय 53 रा. विठ्ठलवाडी, वणी) यांच्यासह दुचाकीने शाळेत जायचे. नेहमीप्रमाणे आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास प्रशांत हे वणीहून श्रीकांत यांच्या दुचाकीवर बसून कुरई येथे शाळेत जात होते.

सव्वा 7 वाजताच्या सुमारास चारगाव चौकी जवळील गतीरोधकाजवळ त्यांच्या दुचाकीसमोर अचानक एक बैल आडवा आला. त्यामुळे श्रीकांत यांनी ब्रेक मारला. दरम्यान त्याच वेळी मागाहून भरधाव ट्रक येत होता. ब्रेक मारल्याने ट्रकची मागून दुचाकीला धडक बसली. ट्रकच्या धडकेमुळे दुचाकी खाली पडली. दरम्यान मागे बसलेले प्रशांत हे ट्रकच्या पुढच्या चाकात आले. ट्रकचे चाक त्यांच्या छातीवरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक असलेले श्रीकांत हे किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर शिरपूर येथे प्राथमिक उपचार करण्यात आले.

सुरक्षेची पुरेपुर काळजी घेऊनही काळाचा घाला…
सुरक्षेत कोणतीही कसर नको म्हणून दोन्ही शिक्षक रोज हेल्मेट घालून शाळेत जायचे. आजही त्यांनी हेल्मेट घातलेले होते. हेल्मेटमुळे गाडी पडल्यानंतरही त्यांच्या डोक्याला इजा झाली नाही. मात्र  प्रशांत यांच्या अंगावरून ट्रक गेल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच शिरपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेचा पंचनामा सुरू असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. एक विद्यार्थीप्रिय शिक्षकाच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे वणी व कुरईमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. 

हे देखील वाचा:

प्रपोज करून शाळकरी मुलीची छेड

कधी सापडणार संतोष गोमकर यांचे मारेकरी? काँग्रेसचा सवाल

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.