भास्कर राऊत, मारेगाव: शेतीची मोजणी लवकर करून देण्यासाठी 15 हजारांची लाच मागितल्या प्रकरणी मारेगाव येथील भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकारी व लिपिकाला अँटी करप्शन ब्युरो अमरावती यांनी रंगेहात पकडले. लिपिक चंद्रकांत अविनाश पाटील व अधिकारी बबन सोयाम असे लाचखोर कर्मचा-यांचे नावे आहेत. या घटनेमुळे परिसरातील कार्यालयामध्ये दहशत पसरली असून इतर कार्यालयेही अलर्ट झाल्याचे दिसून येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील एका शेतक-याला शेतीची त्वरित मोजणी करण्याची होती. त्यामुळे ते भूमिअभिलेख कार्यालयात गेले. तिथे ते अधिकारी बबन श्रीनिवास सोयाम (वय 56 पद. मुख्यालय सहाय्यक अतिरिक्त प्रभार उपअधीक्षक रा. पांढरकवडा) याला संपर्क साधला. यावर त्वरित मोजणीसाठी 25 हजार रुपये लागणार अशी मागणी सोयाम याने केली.
अखेर घासाघिस करून प्रकरण 20 हजार रुपयांवर आले. शेतक-याने 5 हजार रुपये देऊन 15 हजार रुपये 5 तारखेला देण्याचे ठरले. मात्र लाच द्यायची नसल्याने सदर शेतक-याने लाच लुचपत विभागाला याबाबत माहिती दिली. लाचलुचपत विभागाने याबाबत सापळा रचला. आज सदर शेतक-याला 15 हजार रुपये देण्यासाठी बोलवण्यात आले होते. त्यानुसार संपूर्ण फिल्डिंग लावून शेतकरी कार्यालयात पोहोचला असता अधिका-याने लिपिकाजवळ 15 हजार देण्यास सांगितले.
लिपीक चंद्रकांत अविनाश पाटील (वय 46 रा. मारेगाव) याने 15 हजार रुपये लाच स्वरूपात स्वीकारले. पैसे स्वीकारताच अमरावती येथील अधिकाऱ्यांनी त्याला व अधिकारी सोयाम याला रंगेहात पकडले. भर दुपारी घडलेल्या या घटनेने मारेगाव शहर हादरलेले असून याची सर्वत्र चर्चा सुरु आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरोचे विशाल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत, अप्पर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे, पोलीस उपअधीक्षक संजय महाजन अमरावती परीक्षेत्र अमरावती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष इंगळे, पो. ना.युवराज राठोड,निलेश महिंगे, चासफौ सतीश किटकुले यांनी पर पाडली. ही सर्व कारवाई मारेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहेत.
कुप्रसिद्ध म्हणून मारेगावच्या भूमिअभिलेख कार्यालयाची ओळख आहे. कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांचे अनेक कारनामे याआधी मीडियाच्या माध्यमातून चव्हाट्यावर आलेले आहेत. कामाची पद्धत असो की पैसे घेण्याचे प्रमाण असो, या कार्यालयातील सावळागोंधळ नेहमीच जनतेच्या कुतूहलाचा विषय राहिलेला आहेत. विशेष म्हणजे या कारवाईमुळे इतर विभागही अलर्ट झाले आहेत.
हे देखील वाचा:
Comments are closed.