वणी तालुक्यात अनेक गावांवर पाणी टंचाईचे भीषण सावट
प्रशासन पातळीवर तात्काळ उपाययोजना करण्याची गरज
गिरीष कुबडे, वणी: यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने पाण्यासाठी आतापासूनच सर्वत्र हाहाकार माजायला सुरुवात झाली आहे. पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर असलेली वणी तालुक्यातील ४८ गावे तीव्र पाणी टंचाईने होरपळताना दिसत आहे.
तालुक्यातील सर्वच नदी नाल्यांमध्ये आताच ठणठणाट आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावातील विहिरी, बोअरवेलमधील पाणीसाठा नाहीसा होण्याच्या मार्गावर आहे. वणी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या १०१ गावांपैकी ४८ गावांमध्ये जलस्त्रोत नाहीसे होत भूजलपातळी मोठ्या प्रमाणावर खालावलेली गेली आहे.
नोव्हेंबर महिना संपत आला असतानाच दुष्काळाची दाहक दृश्य जाणवायला लागली आहे. पाणी टंचाईची समस्या भयावह रूप धारण करत असुन तालुक्यातील तब्बल ४८ गावांमध्ये भविष्यात टॅकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ तालुका प्रशासनावर येणार कि काय, असे चित्र मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्याचे दिसत आहे.
संपूर्ण विभागात अत्यल्प पाऊस झाल्याने पिके संकटात सापडली असून पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तसंच कमी पावसामुळे उत्पन्नात प्रचंड घट झाली आहे. पिकांवर अनेक रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. बोंडअळीच्या चक्रव्यहात सापडलेल्या अनेक हवालदिल शेतकऱ्यांनी कपाशीवर नांगर चालवल्याच्या घटना उजेडात आल्या आहे. यामुळे भविष्यात जगायला पैसे नाही आणी आताच प्यायला पाणी नाही , अशी विदारक अवस्था अनेक गावात निर्माण झाली आहे.