भास्कर राऊत मारेगाव : शेतामध्ये असलेल्या जनावरांच्या गोठ्याला आग लागून शेतीउपयोगी साहित्य तसेच जनावरांचा चारा जळून भस्मसात झाल्याची घटना मारेगाव तालुक्यातील कुंभा येथे घडली. या आगीमध्ये सुदैवाने पशु व जीवितहानी झाली नाही. मात्र शेतकऱ्याचे 4 ते 4.50 लाख रुपयांचे नुकसान नुकसान झाल्याची माहिती आहे.
तालुक्यातील कुंभा येथील शेतकरी आशिष बबनराव गोखरे यांचे शेतातील गोठ्यामध्ये बैलांचा चारा तसेच शेती साहित्य सुद्धा ठेवलेले होते. सोमवार 2 मे रोजी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान गोठ्याला अचानक आग लागली. त्यात 30 नग टिनपत्रे 30 नग, किमत अंदाजे 28 हजार, ठिबक सिंचनचे पाईप किंमत अंदाजे 3 लाख, लाकडी फाटे 25 नग,अंदाजे 5 हजार, स्प्रिंकलरचे पाईप 30 नग 30 हजार, रासायनिक खत 10 बॅग 13 हजार, जनावरांचा कुटार अंदाजे 20 हजार रुपये, प्लास्टिकचे ड्रम, ताडपत्री, शेतीउपयोगी अवजारे पीव्हीसी पाईप 25 नग असे एकूण अंदाजे 4 लाख 50 हजाराचे साहित्य जळून खाक झाले.
मागील काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. रखरखत्या उन्हामुळे अनेक ठिकाणी आगी लागण्याचे प्रमाण मोठया प्रमाणात घडत आहेत. मशागती करताना शेतातील कचरा जमा करून जाळण्याचे काम शेतकरी करीत आहेत. यातच अनेकवेळा ठिणगी पडून आगी रौद्ररूप धारण करीत असल्याचे प्रकार सध्या अनेक ठिकाणी घडतांना दिसत आहे.
कुंभा येथील प्रगतिशील शेतकरी आशिष गोखरे यांच्या शेतातील गोठ्यात लागलेल्या आगीत त्यांचे लाखोंचे नुकसान झालेले आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित तलाठी यांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. एवढ्या मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्याला शासनाने त्वरित मदत करावी अशी मागणी जोर धरत आहे.
Comments are closed.