डोर्ली मर्डर मिस्ट्री: एक संशयीत ताब्यात

जागलीसाठी गेलेल्या डोर्ली येथील शेतक-याचा खूनच...

जितेंद्र कोठारी, वणी: रविवाली रात्री शेतात जागली करण्यासाठी गेलेले शेतकरी विलास कर्नुजी गोहोकर यांचा दुस-या दिवशी सकाळी शेतात मृतदेह आढळून आला होता. हा घातपात असावा असा संशय मृतकाच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. दरम्यान पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत हा खून असल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणी एका संशयीताला अटक करण्यात आली आहे. तसेच या हत्येला पूर्व वैमनस्याची किनार असण्याची शक्यता असून आरोपी एका पेक्षा अधिक असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. 

मृतक विलास कर्नुजी गोहोकर यांच्याकडे सुमारे 4 एकर शेती आहे. त्यांनी आपल्या शेतामध्ये भुईमूग पेरले होते. त्यासाठी ते दररोज शेतामध्ये जागली करण्यासाठी जायचे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलाचे लग्न झाले होते. त्यामुळे काही दिवस ते जागली करण्यासाठी जात नव्हते. नुकतेच त्यांनी जागलीसाठी शेतात जायला सुरुवात केली होती.

रविवारी दि.8 मेला ते शेतात जागलीसाठी गेले. सोमवारी सकाळी त्यांचा मोठा भाऊ सतीश गोहोकर हे नेहमीप्रमाणे दूध आणण्यासाठी शेतामध्ये गेले असता तिथे त्यांना त्यांचा भाऊ विलास हा खाटेवर आढळून आला नाही. त्यांनी बाजूला बघितले असता खाटेपासून 50 फूट अंतरावर ते खाली मृत अवस्थेत पडून असल्याचे आढळले. तसेच त्यांच्या शरिरावर मारहाणीच्या खूणा व गळा आवळल्याच्या खूणा आढळल्या होता. 

विलास यांच्या कुटुंबीयांनी हा घातपात असल्याची शक्यता वर्तवली होती. तसेच पोलिसांनाही परिस्थितीजन्य पुराव्यावरून हा घातपात असल्याचे आढळताच त्यांनी त्या दिशेने तपासाची दिशा ठरवली. घटनास्थळावर आढळलेला मोबाईल व कपडे पोलिसांनी जप्त केले. तपासासाठी त्यांनी ठसेतज्ज्ञ व श्वान पथकालाही पाचारण केले होते. ठसेतज्ज्ञांनी नमुने गोळा केले आहे. तर श्वान काही अंतरावर जाऊन परत आले होते. त्यामुळे पोलिसांच्या हाती निराशा आली. 

खूनाला पूर्व वैमनस्याची किनार?
मारेगाव पोलिसांनी खूनाच्या दिशेने तपास सुरू केला. दरम्यान त्यांना गावातीलच एका व्यक्तीचा मृतकाशी तीन वर्षांपूर्वी वाद झाल्याचे कळले. त्यावरून पोलिसांनी गावातीलच एका संशयीत तरुणाला ताब्यात घेतले आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संशयीताला 13 मे पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

आरोपींनी अतिशय नियोजनबद्धरित्या सदर खून केला आहे. घटनास्थळी पोलिसांना कोणतेही ठोस पुरावे आढळलेले नाही. शिवाय पोलिसांना या प्रकरणी एका पेक्षा अधिक आरोपी असल्याचाही संशय आहे. दरम्यान विलास यांच्या मोबाईलमध्ये असलेले कॉल डिटेल व शेतात असलेले मोबाईल लोकेशन याद्वाराही पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असल्याची माहिती आहे. 

हे देखील वाचा:

दोन दुचाकीची समोरासमोर धडक, कळमना येथील तरुणाचा मृत्यू

प्रियकराच्या प्रेमाला चांगलाच बहर, प्रेयसी गर्भवती होताच हात वर

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.