बकऱ्या चारायला गेलेल्या वृद्धाचा अखेर आढळला मृतदेह

दोन दिवसांपासून होते बेपत्ता, बेंबळा कालव्याजवळ आढळला मृतदेह

भास्कर राऊत, मारेगाव: शनिवारी सकाळी बकऱ्या चारायला गेलेली देवाळा येथील एक व्यक्ती घरी परत आली नाही. त्यामुळे त्यांचा शोध सुरू होता. अखेर आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास त्या व्यक्तीचा मृतदेह देवाळा परिसरातील कालव्याजवळ आढळून आला रामचंद्र लटारी निखाडे (वय 75) असे मृतकाचे नाव आहे. रामचंद्र यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा कयास व्यक्त केला जात आहे.

रामचंद्र हे देवाळा येथील रहिवाशी होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ते आपल्या मुलामध्ये राहायचे. घरी असलेल्या बकऱ्या चारण्याचे काम रामचंद्र करायचे. शनिवारी दि. 15 मे रोजी ते नेहमीप्रमाणे सकाळच्या वेळेस बकऱ्या चारायला गेले. नेहमीच्या वेळेप्रमाणे बकऱ्या साडे अकराच्या सुमारास घराकडे परत आल्या. परंतु रामचंद्र निखाडे मात्र परत आले नाही.

ते गावामध्ये कोणाकडे बोलत बसले असेल असे घरच्यांना वाटले. परंतु 12-1 वाजले तरीही ते घरी न आल्याने घरच्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने गावशिवारावर सर्वत्र शोधाशोध केली. परंतु ते कोठेही आढळून आले नाही. त्यांनी गावशिवारावरील प्रत्येक भाग पिंजून काढला. वेगवेगळ्या शंका उपस्थित करीत ते स्पॉट देखील बघितले. मात्र त्यांचा काही पत्ता लागला नाही. त्यामुळे त्यांच्या मुलाने याबाबत मारेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती.

अनेकांनी दुपारी पाहिल्याचा दावा
बकऱ्या साडे अकराच्या दरम्यान घरी आल्या. दुपारी बाराच्या दरम्यान यांना मार्डी-देवाळा शिवेवर एका मुलाने बघितल्याची माहिती आहे. त्यानंतर ते साडे बाराच्या दरम्यान देवाळा जवळ असलेल्या तलावाजवळ निंबाच्या झाडाखाली बसून असलेले एका व्यक्तीला दिसले. त्यांनी याबाबत विचारणा केली असता त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. त्यानंतर ते पहापळ शिवारात एका महिलेला दिसले अशी देखील माहिती होती. घरच्यांनी या माहितीच्या आधारे सर्वत्र शोधाशोध केली. परंतु त्यांचा कोठेही थांगपत्ता लागला नाही.

बेंबळा कालव्याच्या शेजारी आढळला मृतदेह
देवाळा शिवारातील बेबळा कालव्याच्या परिसरात दुर्गंध येत होती. त्यामुळे सकाळी 6 वाजताच्या सुमारास काही लोकांनी जाऊन बघितले असता तिथे रामचंद्र यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेहाची ओळख पटताच याची माहिती रामचंद्र यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. मारेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला.

उष्माघात की आणखी काही?
रामचंद्र यांच्या मृत्यूबाबत विविध कयास लावले जात आहे. उन्ह लागल्याने रामचंद्र हे बेंबळा कालव्याजवळ गेले. तिथे ते चक्कर येऊन पडले असावे व उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा असा कयास लावला जात आहे. ते परत न आल्याने बक-या ठरल्या वेळेवर घरी परत आल्या. 

Comments are closed.