जितेंद्र कोठारी, वणी : कृषि विभागाने राज्यात 1 जून पर्यंत कापूस बियाणे विक्रीवर मनाही केली आहे. त्यामुळे तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी बियाणे खरेदीसाठी सीमेलगत असलेल्या तेलंगणा राज्याकडे धाव घेत आहे. नेमकी हीच संधी साधून काही अवैध विक्रेते खेडोपाडी जाऊन शेतकऱ्यांना बोगस व निकृष्ठ कापूस बियाण्याची विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. अश्या अवैध बियाणे विक्रेत्यांवर कारवाईची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. याबाबत तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
राज्यात यंदा मानसून लवकर येण्याचे अंदाज वर्तविले जात आहे. त्यामुळे खत व बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. मात्र कृषी विक्रेत्यांनी 1 जून नंतरच शेतकऱ्यांना कापूस बियाणे विक्री करण्याची सूचना कृषी विभागाने केली आहे. यामागे हंगामपूर्वी कापूस लागवड केल्यास बोन्डअळी प्रादुर्भाव जास्त वाढतो आणि त्याचा परिणाम कापूस उत्पादनावर होतो असे कारण देण्यात आले आहे.
राज्यात सर्वाधिक कापूस उत्पादक क्षेत्र म्हणून यवतमाळ जिल्हा आणि त्यातही वणी विभाग उच्च प्रतीच्या कापूस उत्पादनासाठी प्रख्यात आहे. राज्यात कापसाचे फक्त BG -2 बियाणे विक्री व उत्पादनात परवानगी आहे. तर जवळील तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्यात BG-3 आणि BG- 4 ग्रेडचे कापूस बियाणे बाजारात सहज उपलब्ध आहे. राज्यातही BG-3 व BG-4 बियाणांच्या विक्रीला परवानगी देण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांना अवैधरित्या तस्करी करून आणलेले कापूस बियाणे विकणारे विक्रेत्यांवर कारवाईची मागणीचे निवेदन देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार, विनोद कुचनकार, अनंता जुमळे, रमेश कुचनकार, राजू बोदाडकर, संकेत पारखी , गणेश कावडे, संदिप घुघुल, सचिन पारखी उपस्थित होते.
Comments are closed.