वणीच्या डॉ. आकांक्षा तामगाडगे यांची UPSC परीक्षेत 562 वी रँक

वणीतील विद्यार्थांचा यूपीएससीत डंका... दोन विद्यार्थ्यांनी केली यूपीएससी क्रॅक....

निकेश जिलठे, वणी: वणीतील प्रगती नगर येथील रहिवाशी असलेल्या डॉ. आकांक्षा मिलिंद माधुरी तामगाडगे यांनी यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवत 562 वी रँक मिळवली आहे. डॉ. आकांक्षा यांनी तिस-या प्रयत्नात हे यश मिळवले आहे. दोन वेळा अपयश येऊनही न खचता त्यांनी अथक प्रयत्न करत UPSC परीक्षा क्रॅक केली आहे. विशेष म्हणजे या वर्षीच्या यूपीएससी परीक्षेच्या निकालामध्ये जिल्ह्यात वणी तालुक्याचा डंका दिसून आला. शिरपूर येथील सुमीत रामटेके 358 वी रँक मिळवत आयपीएस झाले आहे. तर डॉ. आकांक्षा यांनी 562 वी रँक मिळवली आहे. 

डॉ. आकांक्षा ही वणीतील डॉ. मिलिंद तामगाडगे व डॉ. माधुरी तामगाडगे यांची कन्या आहे. डॉ. मिलिंद तामगाडगे हे वैद्यकीय सेवेत कार्यरत असून त्यांचे वणीतच हॉस्पिटल आहे. तर डॉ. माधूरी तामगाडगे या सध्या पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी वणीत देखील मेडिकल ऑफिसर म्हणूनही काम केले आहे.

डॉ. आकांक्षा यांनी यवतमाळ येथे त्यांच्या आजोळी आपले प्राथमिक ते 12 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी सेवाग्राम येथील सुप्रसिद्ध महात्मा गांधी मेडिकल कॉलेजमधून MBBS पू्र्ण केले. वैद्यकीय क्षेत्रातील डिग्री मिळवल्यानंतरही प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी आकांक्षाने पुणे गाठले. तिथे 6 महिने स्पर्धा परीक्षेची तयारी केली. पहिल्या प्रयत्नात त्यांना यश आले नाही. त्यानंतर त्यांनी यवतमाळ व वणीत राहूनच यूपीएससीची तयारी पूर्ण केली. दुस-या प्रयत्नात त्या मुलाखती पर्यंत पोहोचल्या मात्र त्यांना परीक्षा क्रॅक करण्यात अपयश आले. अखेर यावेळी तिस-या प्रयत्नात त्यांना यश आले. आकांक्षांना परीक्षेत 562 वी रँक मिळाली.आकांक्षा आपल्या यशाचे श्रेय  आईवडील, मावशी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देते.

कुटुंबीयांसह डॉ. आकांक्षा तामगाडगे

आएएस हेच ध्येय – डॉ. आकांक्षा तामगाडगे
बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर असल्यानेच हे यश प्राप्त करता आले, यूपीएससी परीक्षा जरी कठिण असली तरी ती अशक्य नाही, त्यामुळे आयपीएस मिळाल्यास जॉईन करणार अन्यथा IAS साठी आणखी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया डॉ. आकांक्षा यांनी ‘वणी बहुगुणी’जवळ दिली. तिच्या या यशाबाबत परिसरात कौतुक होत आहे.

आकांक्षाला गेल्या परीक्षेत मुलाखतीमध्ये चांगले मार्क्स मिळाले होते. त्या तुलनेत या खेपेला मुलाखतीत आकांक्षाला कमी मार्क्स मिळाले आहेत. मात्र परीक्षा तिने क्रॅक केली आहे. जर यावेळीही मुलाखतीत चांगले मार्क्स मिळाले असते तर रँक आणखी चांगला असती अशी प्रतिक्रिया देत डॉ. मिलिंद तामगाडगे यांनी मुलाखत मंडळाबाबत नाराजी व्यक्त केली.

यूपीएससीत वणी तालुक्याचा डंका
आजचा दिवस हा वणीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला जाण्यासारखा आहे. आज तालुक्यातील दोन विद्यार्थ्यांनी यूपीएससी क्रॅक केली आहे. यांनी वणी तालुक्याच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत आहे. शिरपूर येथील सुमीत रामटेके 353 वी रँक मिळवत आयपीएस झाले आहेत तर डॉ. आकांक्षा यांनी 562 वी रँक मिळवली आहे. या दोघांच्या यशाची चर्चा केवळ तालुक्यातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात सध्या होत आहे.

हे देखील वाचा:

शिरपूरच्या सुमीत रामटेकेंची उंच भरारी, झाले आयपीएस अधिकारी

Comments are closed.