खासगी बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी लकी ड्रॉ योजना
दर आठवड्यात कास्तकाराला बाईक जिंकण्याची संधी
निकेश जिलठे, वणी: वणीतील खासगी कृषी उत्पन्न बाजार समिती महाविरा अॅग्रीकेअर प्रा. लि. निळापूर रोड, लालगुडा द्वारा शेतकऱ्यांसाठी साप्ताहिक लकी ड्रॉ योजना सुरु करण्यात येत आहे. सदर साप्ताहिक लकी ड्रॉ योजना सोमवार ११ डिसेंबर पासून सुरु होणार आहे. या लकी ड्रॉ द्वारे शेतक-यांना दर आठवड्याला एक बाईक जिंकण्याची संधी मिळणार आहे. यासाठी खासगी बाजाराचे नोंदणीकृत खरेदीदारांना शेतमाल विक्री केल्यानंतर शेतमाल विक्रीची मूळ पट्टी दाखवून महाविरा अग्रीकेअर प्रा. लि. च्या कार्यालयातून लकी ड्रॉ कुपन घेता येईल. शेतकऱ्यांनी आपला कापूस, सोयाबीन, तूर व इतर शेतमाल खासगी बाजार समिती मार्फत व्यापाऱ्यांना विक्री करावे यासाठी ही ड्रॉ योजना सुरू करण्यात आली आहे.
दि. ११ डिसे. ते १६ डिसे. पर्यंतच्या कालावधीत कापूस, सोयाबीन व इतर पिकांच्या विक्रीवर पहिला लकी ड्रॉ दि. १७ डिसे. रोजी काढण्यात येणार आहे. तसेच दुसरा लकी ड्रॉ २४ डिसे. २०१७ ला, तर तिसरा लकी ड्रॉ १ जाने. २०१८ रोजी काढण्यात येईल. भाग्यशाली विजेत्याला महाविरा अॅग्रीकेअर तर्फे एक दुचाकी (शो रूम किंमत) पुरस्कार स्वरूप देण्यात येईल. विजेत्याला वाहनाचे कर, विमा व नोंदणी शुल्क स्वत: भरावे लागणार आहे.
सदर इनामी योजना हि केवळ शेतकऱ्यांसाठी असून इतर कोणीही या योजनेसाठी पात्र राहणार नाही. लकी ड्रॉ कुपन हे शेतकरी सभासद कार्ड असणार आहे. तसंच ते भविष्यात देखील शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरणार आहे.
तालुक्यातील सर्व कापूस, सोयाबीन व तूर उत्पादक शेतकऱ्यांनी आपला शेतमाल महाविरा अॅग्रीकेअर प्रा. लि. निलापूर रोड, लालगुडा या खासगी बाजारात विक्रीस आणून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालक रोशन कोठारी यांनी केले आहे.