विवेक तोटेवार, वणी: वणीतील ढोकेश्वर मल्टिस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या बँकेच्या शाखेला कुलूप असल्याने ठेवीदारांची तारांबळ उडाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून बँकेचा व्यवहार बंद असल्याने ठेवीदार बँकेत चकरा मारीत आहे. तर बँकेला कायमस्वरूपी कुलूप ठोकण्यात आले नाही ना,अशी प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहे. मात्र बँकेने जागेचा किराया न दिल्याने कुलूप ठोकण्यात आले असून विजेचे बिल न भरल्याने वीज पुरवठाही खंडित करण्यात आल्याचे समजते. जी बँक किराया व वीज बिल भरू शकत नाही ती बँक खरंच जनतेच्या मेहनतीचे पैसे देणार काय? असा सवालही गुंतवणूकदार द्वारे विचारण्यात येत आहे.
या अगोदर बँकेचे संचालक मंडळाचे अध्यक्ष व सदस्य यांच्यावर कोर्टात खटला सुरु आहे. याबाबत बँकेचे वकील अनिता जगताप यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की जनतेचे पैसे सुरक्षीत आहे व लवकरच बँकेचा व्यवहार सुरू होईल. सर्व गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळणार पण गेल्या तीन महिन्यांपासून कुणाचेही पैसे परत मिळाले नाही व बँकेचं पूर्ण व्यवहार बंद आहे.
वणीतील बँकेचे व्यवस्थापक आपला मोबाईल बंद करून आहेत. आता काही अफवा अशाही उडताहे की काही ठिकाणच्या बँकेतील व्यवहार सुरू झाले आहे. अशा वेळी ठेवीदार व गुंतवणूकदार यांनी कुणाकडे दाद मागावी, कारण वणी व चिखलगाव येथील शाखेचे व्यवहार बंदच आहेत. याबाबत काही गुंतवणीकदार तर पोलिसात तक्रार देण्याची तयारी दाखवत आहे. परंतु पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतरही पैसे किती दिवसात मिळेल हे काही निश्चित सांगता येत नाही. यासाठी किती वेळ लागेल हेही निश्चित नाही.
कित्येक ठेवीदारांच्या ठेवीची मुदत संपली आहे. परंतु त्यांनाही अजूनही त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले नाही. हे सर्व ठेवीदार आता तक्रार करण्याच्या तयारीत आहेत. बँकेच्या संचालक मंडळाकडून ज्या कर्मचाऱ्यांना बँकेत नोकरी देण्यात आली त्यांच्याकडून काही रक्कम बँकेत जमा ठेवण्यात आली. त्या कर्मचाऱ्यांनाही पैसे मिळणार की नाही हेही स्पस्ट नाही. काही कर्मचारी तर आता दुसऱ्या ठिकाणी नोकरी करीत आहे.
बँकेने कर्मचा-यांना मुदत ठेव जमा करण्याकरिता टार्गेट दिले होते. अशा वेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या संबंधातील व जवळच्या व्यक्तीकडून अशा रकमा बँकेत जमा केल्या. परंतु आता नातेसंबंधातील व्यक्तीला पैसे मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे भावना निर्माण झाली आहे . शिवाय नातेसंबंधही वाईट झाले आहे.
वणी येथील शाखा बंद असल्याने चिखलगाव येथील बँकेला भेट दिलीं असता तेथील व्यवस्थापकांनी म्हटले की, डिसेंबर 30 पर्यंत बँकेची व्यवहार सुरू होईल, कारण बँकेने 22 ते 25 लाखांपर्यंतचे कर्ज वाटप केले आहे व त्या कर्जाची वसुलीची सुरू आहे. बँकेत 70 ते 75 लाख रुपये ग्राहकांची ठेवी आहे. महाराष्ट्रत 175 शाखा या बँकेच्या आहेत. इथल्या प्रत्येक शाखेमध्ये काही ना काही समस्या सुरू आहे. नवीन संचालक मंडळ स्थापन झाल्यानंतर लवकरच व्यवहार पूर्ववत सुरू होईल असे बोलले जात आहे. परंतु याअगोदरही 30 ऑक्टोबर ही तारीख बँकेच्या व्यवस्थापककडून देण्यात आली होती. मात्र अद्याप पैसे मिळाले नाही. आता या प्रकरणी बँकेचे कर्मचारी व ग्राहक कुठली भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.