दुस-या फळीतील नेत्यांना वेध थेट नगराध्यक्ष निवडणुकीचे

शिंदे सरकार घेऊ शकते जनतेतून थेट नगराध्यक्ष व सरपंच निवडण्याचा निर्णय

निकेश जिलठे, वणी: फडणवीस सरकारचा थेट नगराध्यक्ष आणि सरपंच निवडण्याच्या निर्णयाला ठाकरे सरकारने स्थगिती दिली होती. मात्र आता पुन्हा एकदा नगराध्यक्ष व सरपंच थेट जनतेतून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिंदे सरकार येताच राज्याच्या राजकीय वर्तुळात ही शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत भाजपतर्फे मागणी करण्यात आली आहे. थेट नगराध्यक्ष निवडणूक होण्याच्या हालचाली निर्माण झाल्याने स्थानिक राजकीय वातावरण आतापासून ढवळून निघण्यास सुरुवात झाली आहे. वणीतील विविध पक्षाचे दुस-या फळीचे नेते व युवा नेते येत्या काही दिवसांमध्ये कंबर कसताना दिसू शकते.

वणीत याआधीही थेट नगराध्यक्ष निवडण्यात आला होता. मात्र काही काळाच्या अवकाशानंतर गेल्या नगरपालिका निवडणुकीत थेट नगराध्यक्ष निवडणूक झाली. यात दिग्गजासह दुस-या फळीतील नेत्यांनीही आपले नशिब आजमावले होते. मात्र भाजपचे युवा नेते तारेंद्र बोर्डे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आल्याने संपूर्ण 5 वर्षांचा काळही तारेंद्र बोर्डे यांनी विना अडथळा पूर्ण केला. त्याचा फायदाही विकासकामांमध्ये दिसून आला.

जुने उमेदवार पुन्हा राहणार इच्छुक?
गेल्या निवडणुकीत भाजपतर्फे तारेंद्र बोर्डे, काँग्रेसतर्फे ऍड. देविदास काळे, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे किरण देरकर, शिवसेने तर्फे गणपत लेडांगे, मनसे तर्फे राजू उंबरकर हे प्रमुख पक्षांचे उमेदवार होते. यावेळीही थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय झाल्यास भाजपतर्फे तारेंद्र बोर्डे पुन्हा दावा करू शकतात. काँग्रेसतर्फे गेल्या वेळी उभे असलेले ऍड देविदास काळे हे सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. त्यांनी अलिकडेच विरोधकांना चारी मुंड्या चीत करीत रंगनाथ स्वामी पथसंस्था काबिज केलीये. तर येत्या काही दिवसांमध्ये वसंत जिनिंगची निवडणूक देखील आहे.

मनसेतर्फे गेल्या वेळी राजू उंबरकर यांनी नगराध्यक्षपदासाठी नशिब आजमावले होते. मात्र त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला होता. यावेळी ते नगराध्यक्षासाठी निर्णय घेणार की सर्व लक्ष विधानसभेवर केंद्रीत करणार हे देखील काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार. सेनेमध्ये सध्या अनेक नावे चर्चेत आहेत. थेट निवडणूक असल्याने सेनेतील अनेक दुस-या फळीचे नेते याशिवाय काही युवा नेतेही तिकीटासाठी दावा करू शकतात.

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते व नेते काँग्रेसमध्ये गेल्याने राष्ट्रवादी सध्या एकाकी पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे एखाद्या नवख्या उमेदवाराला तिकीटाची लॉटरी लागू शकते. वंचित बहुजन आघाडी व संभाजी ब्रिगेड देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे थेट निवडणूक झाल्यास अनेक इच्छुक नेते आता पासूनच फिल्डिंग लावण्याच्या तयारीला लागू शकतात.

ठाकरे सरकारने घेतलेले अनेक निर्णयांना सध्या शिंदे सरकार स्थगिती देत आहे. त्यात मेट्रो कारशेडच्या निर्णयाला स्थगिती देण्यात येणार असल्याचे आधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यानंतर आता थेट जनतेतून नगराध्यक्ष व सरपंच निवडीच्या निर्णयाची मागणी भाजपचे नेते चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. येत्या काही दिवसांमध्येच नगरपालिकेच्या निवडणूक आहेत. त्यामुळे थेट नगराध्यक्षाचा निर्णय हा तातडीने घेतला जाऊ शकतो अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. त्याचे परिणाम हे येत्या नगरपालिका निवडणुकीत नक्कीच दिसून येणार.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.