नगराध्यक्षांची थेट जनतेतून निवड, वणीतील दिग्गज नेते आजमावणार नशिब
भाजप मनसेकडून निर्णयाचे स्वागत, तर सेना, काँग्रेसकडून निषेध
जितेंद्र कोठारी, वणी: आज राज्य सरकारने थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत वणीतील स्थानिका राजकारणातून संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. भाजप व मनसेने याचे स्वागत केले आहे. तर काँग्रेस आणि सेनेने हा निर्णय लोकहिताचा नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. मात्र आता थेट जनतेतून नगराध्यक्षांची निवड होणार असल्याने दुस-या फळीतील दिग्गज नेते, विधानसभेसाठी इच्छुक असणारे नेते यासोबतच अनेक युवा नेतेही तयारीला लागणार आहे. याबाबत वणीतील विविध पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया ‘वणी बहुगुणी’ने घेतल्या आहे.
विकासाला गती मिळणार – तारेंद्र बोर्डे
थेट नगराध्यक्ष असल्यास विकास कामांना गती मिळते. अनेक नगरसेवक विकासकामांमध्ये खोडा घालतात. थेट नगराध्यक्ष झाल्यास निर्णय घेणे सोयीस्कर होते. थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा वणीकरांना 5 वर्षांत चांगला फायदा झाला आहे. विकास कामांचा असा वेग या आधी कधीही नव्हता. विकासकामांना गती देणारा निर्णय घेतल्याने शिंदे सरकारचे आभार.
– तारेंद्र बोर्डे, नेते भाजप, माजी नगराध्यक्ष वणी नगरपालिकाघोडेबाजाराला आळा बसणार – राजू उंबरकर
सरपंच व नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याचा शिंदे सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. जनतेला थेट त्यांचा प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार मिळेल. तसेच निवडणुकीनंतर होणाऱ्या घोडेबाजारला या निर्णयामुळे आळा बसेल.
– राजू उंबरकर- राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
थेट नगराध्यक्ष निवडीत अनेक उणिवा – देविदास काळे
काही वर्षांआधी थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा प्रयोग काँग्रेसने केला होता. मात्र त्यातील उणिवा लक्षात आल्याने हा निर्णय रद्द करण्यात आला होता. नंतरच्या काळात लोकांच्या मतांची लाट पाहून भाजप सरकारने हा निर्णय पुन्हा घेतला होता. नगरसेवक हे जनतेतूनच निवडून आलेले असल्याने त्यातून नगराध्यक्षाची निवड होणे हे अधिक संयुक्तीक आहे. मुख्यमंत्री, पंतप्रधान देखील याच पद्धतीने निवडले जातात. नगरपालिकांचे नियम आणि कायदेही नगरसेवकांमधून निवडून दिलेल्या नगराध्यक्षांसाठी तयार झाले आहे. नगराध्यक्षांना जर नगरसेवकांचे पुरेसे बळ नसेल तर नगराध्यक्ष कोंडीत पकडला जाऊ शकतो. किंवा नगराध्यक्षांची एकाधिकारशाही देखील वाढू शकते.
– ऍड. देविदास काळे, नेते काँग्रेसएकाधिकारशाहीला प्रोत्साहन मिळणार – राजू तुराणकर
मविआ सरकारने लोकहिताचा घेतलेला निर्णय रद्द करणे हे दुर्दैवी आहे. थेट निवड झाल्याने नगराध्यक्षांच्या मोनोपॉलीला चालना मिळते. अनेक निर्णय नगराध्यक्ष हे नगरसेवकांना विश्वासात न घेतात. गेल्या पंचवार्षीकमध्येही एकाधिकारशाहीने अनेक चुकीचे निर्णय घेतल्याचे वणीकरांनी अनुभवले आहे. त्याचा विरोधही झाला होता. नगरसेवकांना नामधारी करण्याचा हा प्रकार आहे,
-राजू तुराणकर, शहर अध्यक्ष शिवसेना
Comments are closed.