पूर ओसरला… गावात फक्त चिखल, अनेक घरांचे नुकसान
वणी-वरोरा मार्ग संपूर्ण बंद, वणी-घुग्गुस रोड अवजड वाहनासाठी बंदच.... शुक्रवार पासून होणार नुकसानीच्या पंचनाम्याला सुरुवात
जितेंद्र कोठारी, वणी: सध्या गावातील पुराचे पाणी ओसरले आहे. शिवाय पाटाळ्याच्या पुलाचे पाणी देखील ओसरले आहे. त्यामुळे चार दिवसानंतर आज पुलाचे दर्शन लोकांना झाले. मात्र पुरामुळे पुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे अद्यापही या मार्गावरून वाहतूक सुरू झालेली नाही. तर वणी-घुग्गुस मार्गावरील घुग्गुस जवळील पुलावर खड्डा पडल्याने या मार्गावरून अद्यापही अवजड वाहतूक बंद आहे. त्यामुळे आजही नागपूर येथे जाणा-या ट्रॅव्हल्स, ट्रकची वाहतूक आज जाम-हिंगणघाट मार्गाने झाली. दरम्यान पुलावरील सदर खड्डा बुजवण्याचे काम सुरू असल्याची माहिती आहे.
पूरग्रस्त लोकांना सावर्ला येथे हलवण्यात आले होते. पूर ओसरल्यानंतर लोकांनी घराकडे धाव घेतली आहे. सध्या पूरग्रस्त गावातील परिस्थिती अत्यंत भीषण आहे. संपूर्ण गाव हे चिखलाने माखलेले आहे. अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अनेक शेतक-यांचे शेतात ठेवलेले साहित्य तसेच गोठ्यात बांधलेले जनावरे वाहून गेल्याची माहिती आहे.
उद्यापासून होणार पंचनाम्याला सुरूवात
पूर ओसरल्यामुळे शुक्रवारपासून नुकसानीच्या पंचनाम्याला सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. शेतीचे झालेले नुकसान, घरांचे झालेले नुकसान इत्यादींचा पंचनामा केला जाणार आहे. तसेच अनेकांचे जनावरे देखील वाहून गेले आहे. याची देखील माहिती प्रशासनातर्फे घेतली जाणार आहे. दरम्यान सर्वच पक्षाने वणी, मारेगाव व झरी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच पुरामध्ये पशूधन, बि-बियाणे, खते, अवजारे याचे वाहून गेले आहे त्याची देखील नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.
वणी-वरोरा रोड सुरू व्हायला आणखी प्रतीक्षा
पुरामुळे पाटाळ्याच्या पुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुलावरचे डांबर व सिमेंट पुलावरून वाहून गेले व सळाखी बाहेर आल्या. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने बंद करण्यात आला आहे. प्रशासनातर्फे NHAI (नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया) ला लवकरात लवकर सर्वे करून हा पूल सुरू करण्याची सूचना केली आहे. दरम्यान आज पुलाची डागडुजी करण्यात येत असल्याची माहिती आहे. डागडुजीनंतर वाहतुकीस पूल योग्य आहे की नाही हे तपासले जाणार आहे. त्यानंतर पुलावरून वाहतुकीस परवानगी मिळणार आहे.
वर्धा नदीवरील मुंगोली येथील पूल क्षतीग्रस्त
वर्धा नदीला आलेल्या महापुरामुळे मुंगोली येथील पुलाला मोठ्या प्रमाणावर क्षती पोहचली आहे. त्यामुळे संरचनात्मक तपासणी व दुरुस्ती होईपर्यंत या पुलावरून वाहतूक बंद ठेवण्यात यावी. अशी मागणीचे निवेदन मुंगोली, माथोली, कोलगाव, जुगाद, कैलाशनगर, साखरा येथील ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी केली आहे. मुंगोली येथील पूल तीन दिवस पाण्याखाली असल्यामुळे पुलावरील डांबरीकरण व सिमेंटचा स्लॅब अनेक ठिकाणी वाहून गेला आहे. तसेच पुलाच्या दोन्ही बाजूस अप्रोच रस्ता पाण्याच्या प्रवाहामुळे 20 ते 30 फिट पर्यंत तुटून दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनाचे अपघात होण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा:
पुराने घेतला शेकडो पशूधनाचा जीव, रात्रीत झाले होत्याचे नव्हते…
Comments are closed.