पुरुषोत्तम नवघरे, वणी: सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. रमेशपंत शंकरराव गोफणे यांचे आज दिनांक 27 जुलैला बुधवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून ते आजारी होते. मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. रमेशपंत हे डॉ. विवेक गोफणे यांचे वडील आहे.
रमेशपंत गोफणे यांचा जन्म 1 मे 1958 रोजी वणी येथे झाला. त्यांनी 10 वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. मात्र घरातील जबाबदारी म्हणून पार पडण्यासाठी त्यांनी शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात ते रुद्रा पाटील देरकर यांच्या संपर्कात आले. ते रमेशपंत यांना मानसपूत्र मानायचे. रुद्रा पाटील यांच्यासोबत ते कायम त्यांची सावली म्हणून राहिले.
1998 – 1999 च्या काळात त्यांनी जगन्नाथ महाराज देवस्थान वणी येथून कीर्तनाला सुरुवात केली. अल्पावधीतच वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार म्हणून त्यांची परिसरात ओळख निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी अनेक जिल्हात कीर्तनाचे कार्यक्रम केले. ते दरवर्षी न चुकता वारी देखील करायचे. सद्गुरू जगन्नाथ महाराज संस्था, वणी (वेगाव) याचे ते सचिव होते तर वारकरी संप्रदाय संस्थेचे ते तालुका अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंड असा मोठा आप्त परिवार आहे.
Comments are closed.