अखेर वणीत शिंदे गटाची एन्ट्री, माजी पदाधिका-यांनी घेतली संजय राठोड यांची भेट
राजू तुराणकर, ललित लांजेवार, गजानन किन्हेकर, विनोद मोहितकर इत्यादींचा समावेश
निकेश जिलठे, वणी: शहरातील शिवसेनेच्या काही माजी पदाधिका-यांनी व कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांचे समर्थक व बंडखोर आमदार संजय राठोड यांची भेट घेतली. त्यामुळे आता वणी शहरात शिवसेनेमध्ये शिंदे गटाच्या एन्ट्रीवर शिक्कामोर्तब मानले जात आहे. भेट घेणा-यांमध्ये माजी शहर प्रमुख राजू तुराणकर, माजी युवासेना पदाधिकारी ललित लांजेवार, मारेगाव येथील शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख व अलिकडेच काँग्रेसमध्ये गेलेले गजानन किन्हेकर, किशोर नांदेकर, झरीतील बाळू चिडे यांच्यासह पूर्वाश्रमीचे शिवसैनिक, माजी जिल्हा प्रमुख मात्र काही वर्षांआधी काँग्रेसमध्ये गेलेले विनोद मोहितकर यांच्यासह वणी विधानसभा क्षेत्रातील माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा समावेश आहे.
काही दिवसांआधीच नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे शहर प्रमुख राजू तुराणकर यांना पदावरून काढून सुधीर थेरे यांच्याकडे शहर प्रमुख पदाची जबाबदारी दिली. तेव्हापासून ते नाराज होते. त्यांनी पक्षात खच्चीकरण केलं जात असल्याचा आरोप करत याबाबतची नाराजी जाहीरपणे बोलूनही दाखवली होती. या पार्श्वभूमीवर आज शनिवारी दिनांक 30 जुलै रोजी दुपारी यवतमाळ येथे राजू तुराणकर, विनोद मोहितकर, किशोर नांदेकर, बाळू चिडे, गजानन किन्हेकर, ललित लांजेवार, टिकाराम खाडे (पंचायत समिती सदस्य), सुधाकर गोरे (माजी पंचायत समिती सभापती,) विजू मेश्राम (माजी शहर प्रमुख, मारेगाव), प्रेमनाथ ढवळे, गोपाल खामनकर, बाळू भोंगळे, रितेश ठाकरे इत्यादींनी संजय राठोड यांची भेट घेतली. त्यामुळे ते शिंदे गटात गेल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आज संजय राठोड यांच्याशी झालेल्या बैठकीत वणी विधानसभाक्षेत्र, आगामी वणी नगरपालिका निवडणूक व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.
आम्ही शिवसैनिकच व पक्षातच – ललित लांजेवार
आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्ही पक्षातच आहोत. उलट आता जुने शिवसैनिकही एकत्र आले आहेत. विनोद मोहितकर, गजानन किन्हेकर यासारखे कडवट शिवसैनिक हे पुन्हा सेनेत आले आहे. त्यामुळे वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेला आणखी बळकटी मिळणार आहे. आम्ही पक्षातच आहोत. पक्ष वाढवण्यासाठी व आगामी निवडणुकीसाठी आम्ही जोशाने कामाला लागणार आहोत.
– ललित लांजेवार, माजी युवासेना पदाधिकारी———————–
शिवसेनेला कोणताही फरक पडणार नाही – विश्वास नांदेकर
ज्यांनी बंडखोरांची भेट घेतली. यातील अनेकांचा सेनेशी संबंध नव्हता. कुणी आधीच सेना सोडली होती, कुणी भाजपला मदत करत होते. तर कुणी पक्षात राहून पक्षविरोधी कामात व कुरघोडी करण्यात आघाडीवर राहायचे. कुणी बंडखोरांची साथ देत असले तरी यात पक्षाचे कोणतेही नुकसान नाही व पक्षाला काही फरकही पडणार नाही.
– विश्वास नांदेकर, जिल्हा प्रमुख शिवसेना
सध्या खरी शिवसेना कोणती यासाठी सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरू आहे. या प्रक्रियेत एकीकडे पदाधिका-यांना आपापल्या गटात ओढण्यास चढाओढ सुरू झाली आहे. तर शिंदे गटाशी जवळीक असणा-या पदाधिका-यांना पदावरून काढून टाकण्यात येत आहे. वणीमध्ये शिवसेनेचे शहर प्रमुख राजू तुराणकर यांनाही काही दिवसांआधी शहर प्रमुख पदावरून दूर करण्यात आले होते. सुधीर थेरे यांना पुढे आणण्यासाठी पदावरून काढण्यात आले की शिंदे गटाशी जवळीक साधत असल्याने त्यांचे पद काढण्यात आले होते याबाबत स्थानिक राजकीय वर्तुळात विविध तर्क लावले जात आहे. दरम्यान शिंदे गट पुन्हा राजू तुराणकर यांना शहर प्रमुख पद देणार की आणखी कोणते पद, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
Comments are closed.