अपघात: उभ्या ट्रकवर आदळली भरधाव कार, एक ठार, एक गंभीर

वणी-यवतमाळ मार्गावरील निंबाळा फाट्याजवळील घटना

जितेंद्र कोठारी, वणी: रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव कारने मागून धडक दिली. या अपघातात कारमधील एक व्यक्ती जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. मारेगाव वणी मार्गावर निंबाळाजवळ शनिवारी रात्री 10 वाजता दरम्यान हा भीषण अपघात घडला. अमोल देठे, (40) रा. छोरिया ले आऊट वणी असे मृत युवकाचे नाव आहे. तर गंभीर जखमी आकाश लालसरे याला तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र स्थिती गंभीर असल्याने त्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार वणी येथील छोरिया ले आऊट येथील रहिवासी अमोल देठे, आकाश लालसरे आणि तेजस मडावी शनिवारी रात्री 10 वाजता दरम्यान हुंडाई सेन्ट्रो कार क्रमांक (MH29M 9331) ने वणीकडे येत होते. सोमनाळा फाट्यापासून निंबाळा फाट्यापर्यंतच्या अंतरावर उतार आहे. दरम्यान उतारावरून भरधाव येत असताना निंबाळा फाट्याजवळ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या (MH18AZ 6090) या क्रमांकाच्या ट्रकवर भरधाव कार मागून आदळली.

या भीषण दुर्घटनेत कारचा समोरील भागाचा चेंदामेंदा होऊन कार चालकाच्या बाजूच्या सीटवर बसलेल्या अमोल देठे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. कार चालक आकाश लालसर हा गंभीर जखमी झाला तर मागील सीटवर बसलेल्या तेजस मडावी या तरुणाला किरकोळ इजा झाली.

समोरून येणाऱ्या वाहनाच्या हेडलाईटमुळे रस्त्याच्या कडेला उभा असलेला नादुरुस्त ट्रक कार चालकाला दिसून आल्या नसल्याने अपघात घडल्याचा अंदाज आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील लोक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले.

हे देखील वाचा:

अखेर वणीत शिंदे गटाची एन्ट्री, माजी पदाधिका-यांनी घेतली संजय राठोड यांची भेट

या विकेंडला अनुभवा ‘एक व्हिलन रिटर्न्स’चा थरार

Comments are closed.