ओबीसींचा एल्गार: वणीत मंडल यात्रेचे जंगी स्वागत
ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेशिवाय ओबीसींचा विकास नाही, मान्यवरांचे प्रतिपादन
पुरुषोत्तम नवघरे, वणी: ओबीसींची स्वतंत्र जनगणना, ओबीसी राजकीय आरक्षण इत्यादी मागणीसह मंडल आयोगाबाबत ओबीसींमध्ये जनजागृती करण्यासाठी आज मंडल यात्रा वणीत पोहोचली. या मंडल यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी झालेल्या सभेत उपस्थित वक्त्यांनी ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेशिवाय ओबीसींचा विकास नाही अशी भूमिका मांडली. कार्यक्रमाला वणी आणि परिसरातील मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव सहभागी झाले होते.
सध्या ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी जनजागृती अभियान अंतर्गत ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी तसेच मंडल आ विदर्भातील 7 जिल्ह्यात दिनांक 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट पर्यंत मंडल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आज शुक्रवारी दिनांक 5 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास वणीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंडल यात्रेचे आगमन झाले. यात्रे करीता ज्ञानेश वाकुडकर, बळीराज धोटे, दिनानाथ वाघमारे, उमेश कोराम, मुकुंद अडेवार, अनिल डहाके, वंदना वनकर, पियुष आखरे, स्मिता ताटेवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हरार्पण केल्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरवात झाली. जाती निहाय जनगणना समितीचे प्रदीप बोनगिरवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सभेत मान्यवर वक्त्यांनी ओबीसींचे विविध प्रश्न मांडत ओबीसींच्या हक्कांबाबत प्रबोधन केले. वक्त्यांनी ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यास नकार देणा-या सरकारवर जोरदार प्रहार केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण खानझोडे यांनी केले. सदर कार्यक्रम ओबीसी महिला समन्वय समिती, ओबीसी महिला मोर्चा, ओबीसी (व्हीजेएनटी, एसबीसी) जातनिहाय जनगणना कृती समिती द्वारा आयोजित करण्यात आला होता यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. सभेनंतर मंडल यात्रेने मारेगावकडे प्रस्थान केले.
Comments are closed.