चिंचाळा येथील बोगस डॉक्टरवर कारवाई

तालुक्यातील बोगस डॉक्टर आरोग्य विभागाच्या रडारवर

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील बोगस डॉक्टर हे आरोग्य विभागाच्या रडारवर असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. चिंचाळा येथे प्रॅक्टिस करीत असलेल्या एका बोगस डॉक्टरवर तालुका आरोग्य अधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांनी धाड टाकली आहे. त्यामुळे बोगस डाक्टरांचे धाबे दनानले असल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यामध्ये बोगस डॉक्टरांचे मोठे नेटवर्क आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेच्या जीवाशी खेळण्याचे काम या बोगस डॉक्टरांकडून होत असते. अनेकवेळा यांची पुरेपूर माहिती आरोग्य विभाग तसेच पंचायत समिती यांचेकडे असताना सुद्धा याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप सातत्याने होतो. अशातच दि. 4 ऑगस्टला चिंचाळा येथे एक बंगाली डॉक्टर अवैधरित्या प्रॅक्टिस करीत असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली.

यावरून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचे मार्गदर्शनात तालुका आरोग्य अधिकारी अर्चना देठे यांनी आपले कर्मचारी सोबत घेत चिंचाळा येथे दुपारी 3 वाजता धाड टाकली. यावेळी प्रणव मंडल हा अवैधरित्या व्यवसाय करीत असल्याचे आढळून आला. त्यांच्याकडे महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय कायदा 1961 अंतर्गत ऍलीओपॅथी करण्यास परवानगी नाही. त्यांचेकडे नॅचरोपॅथी आणि योगाचा 2 वर्षाचे डिप्लोमा प्रमाणपत्र आढळून आले. त्यांना फक्त नॅचरोपॅथी योगा करण्याची परवानगी आहे.

त्यांच्याकडे परवानगी नसलेली ऍलोपॅथी औषधी आढळून आली. याविषयीं विचारणा केली असता डॉक्टरणी कोणतेही उत्तर दिले नाही. अर्चना देठे यांनी पोलिसांना बोलावून या बोगस डॉक्टरवर कारवाई केली. यावेळी त्यांचेजवळील औषधी जप्त करण्यात आली. सदर बोगस डॉक्टरवर महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय कायदा 1961 च्या कलम 33 नुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

Comments are closed.