वणी(रवि ढुमणे): वणी उपविभाग व लगतच्या पांढरकवडा भागातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर एलसीबीच्या पथकाने धाडी टाकून हजारो रुपयाच्या मुद्देमालासह काही लोकांना ताब्यात घेऊन मटका चालविणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहे. परंतु वर्षाच्या सरते शेवटीच एलसीबी पथकाला केवळ मटका व्यवसाय कसा काय दिसायला लागला असे प्रश्न उपस्थित होत आहे.
वणी उपविभागात येणाऱ्या सर्वच ठाण्याच्या हद्दीत मटका जुगार यासारखे अवैध व्यवसाय गेल्या कित्येक वर्षांपासून फोफावले आहेत. या अवैध व्यवसायाला स्थानिक पुढारी तसेच लोकप्रतिनिधी चे पाठबळ मिळत आहे. यात स्थानिक पातळीवर पोलीस कारवाई करतांना दिसत आहे. मात्र अद्याप या व्यवसायाला आळा बसला नाही. स्थानिक पोलीस,उपविभागीय अधिकारी यांचे पथक घिरट्या घालतांना दिसतेय खरे पण ठोस कारवाई अद्याप कुणी केलीच नाही. परिणामी एलसीबी पथक गेल्या दोन दिवसांपासून वणी उपविभागात दाखल झाले आहे. वणी शहरातील विविध ठिकाणी धाडी मारून मटका चालविणाऱ्या नोकरांना हजारोच्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन मटका व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केले आहे.
सोबतच शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका व्यावसायिकांवर धाडी टाकल्या आहेत. इतकेच नव्हे तर वडकी,राळेगाव आदी ठिकाणी धाडी मारून कारवाई एलसीबीच्या पथकाने केली आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक संजय देशमुख, एपीआय नितीन पतंगे, सारंग मिरासी,भीमराव शिरसाठ,गजानन डोंगरे,सुधाकर गदाई,संदीप म्हेत्रे आणि दळवी यांनी केली आहे.
आजही एकता नगर भागातील नगर पालिकेच्या चाळीतील मटका अड्ड्यावर एलसीबीच्या पथकाने धाड टाकली. मात्र काही निवडक व्यावसायिकांना मुभा दिली असल्याची चर्चा आहे. सत्तारूढ पक्षातील कार्यकर्ते यांच्या अवैध व्यवसायावर एलसीबीने जणू सहकार्य केले असल्याची। चर्चा आहे.
वर्षाच्या सरते शेवटी एलसीबी वणीत
जिल्ह्यात चोरी,खून, टोळी पथके ,दुचाकी चोरी आदी गुन्हे प्रलंबित आहेत. कित्येक गुन्ह्याचा तपास अद्याप थंडबसत्यात अडकला असतांना एलसीबी पथक मटका जुगारकडे केंद्रित झाले आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वी शिरपूर हद्दीतील पुरड(नेरड) येथील नरेश कुळमेथे या तरुणाचा खून करून मृतदेह रेल्वेच्या रुळावर टाकून आरोपी पसार झाले होते. पोलिसांनी या घटनेचा तपस केला होता. परंतु पोलिसांना आरोपी पकडण्यात अपयश आले. जेव्हा गंभीर गुन्ह्याचा तपास पूर्ण होत नाही तेव्हा एलसिबी कडे तपासाची सूत्रे देण्यात येतात. मात्र गेली तीन वर्षे झालेत अद्याप नरेशचे मारेकरी गवसले नाही. गंभीर गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांसह एलसीबी पथक सुद्धा सपशेल फेल झाले आहेत. केवळ मटका व्यवसायिकावर कारवाई करून एलसीबी पथक वणी परिसरात दाखल झाले आहे.
एकूणच गंभीर गुन्ह्याचा तपास सोडून एलसीबी केवळ मटका जुगारकडे वळली आहे. शिरपूर हद्दीतही अवैध व्यवसाय जोरात सुरू आहे. भालर,बेलोरा आदी गावात व्यावसायिकांचे अड्डेच तयार आहे परंतु एलसीबी ला हे अड्डे दिसलेच कसे नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.