पुराचा वणी तालुक्यात पुन्हा कहर, अनेक गावांचा संपर्क तुटला
अनेक गावाच्या वेशीपर्यंत पोहोचले पाणी, जुनी परिस्थिती उद्भवण्याची भीती... पाटाळ्याच्या नवीन पुलापर्यंत पाणी, वणी-वरोरा वाहतूक बंदच
जितेंद्र कोठारी, वणी: जुलै महिन्यात आलेल्या पुरातून पूरग्रस्त अद्याप सावरले नसताना आता पुन्हा पुराचा कहर पाहायला मिळत आहे. शेलू, रांगणा, भूरकी, कोना, झोला, कवडशी, सावंगी, उकणी इत्यादी गावांच्या वेशीवर पुराचे पाणी पोहोचले आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सातत्याने सुरू आहे. त्यातच मुसळधार पाऊस सुरु असल्याने जुलै महिन्यातील परिस्थिती पुन्हा उद्भवण्याची भीती वर्तवली जात आहे. पूर परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. दरम्यान वर्धा नदीच्या पाण्याची पातळीत विलक्षण वाढ झाल्याने आज मंगळवारी दिनांक 9 ऑगस्टच्या सकाळ पर्यंत नवीन पुलापर्यंत पाणी पोहोचले आहे. परिणामी वणी-वरोरा मार्ग आणखी दोन-तीन दिवस बंद राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वणी तालुक्यात झोला, कोना, शेलु (खु.), रांगणा वडा, जुगाद, सावंगी (जुनी), सावंगी (नवीन), मुंगोली, माथोली, चिंचोली, जुनाड, कोलगाव, उकणी, कवडशी, उकणी इत्यादी गावे पुराबाबत संवेदनशील म्हणून ओळखले जाते. हे गावे वर्धा नदी व पैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर वास्तव्यास आहे. तर काही गावे निर्गुडा नदीच्या तिरावर वसलेले आहे. या सर्वच गावाच्या वेशीवर पुराचे पाणी पोहोचल्याने या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सकाळपर्यंत नदीला तसेच नाल्याला पूर आल्याने तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
वर्धा नदीवर असलेल्या चार धरणाचे पाणी सोडण्यात आले की त्याचे बॅक वॉटर हे वणी तालुक्यातील दक्षिण भागात असलेल्या गावांना बसतो. चिंचोली आणि सावंगी (जुनी) या गावाच्या मध्ये असलेल्या नाल्याच्या माध्यमातून वर्धा नदीचे पाणी निर्गुडेत मिसळते व परिणामी निर्गुडा नदीला पूर येतो. त्यामुळे सावंगी जुनी आणि चिंचोलीचा संपर्क त्या बाजूने तुटतो. बॅक वॉटरमुळे या भागातील शेतामध्ये माणूसभर पाणी साचते अशी माहिती गावक-यांनी दिली आहे. पूरपरिस्थतीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
नागपूरसाठी घुग्गुस-चंद्रपूर मार्गे वाहतूक
पाटाळ्याच्या नवीन पूल तयार होत असल्याने सध्या जुन्या पुलावरूनच वणी-वरोरा वाहतूक सुरू आहे. काल सोमवारी दिनांक 8 ऑगस्ट रोजी संध्या. 5 वाजताच्या सुमारास जुना पूल पाण्याखाली आला. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद कऱण्यात आला. त्यामुळे सध्या वरोरा-नागपूर वाहतूक ही घुग्गुस-चंद्रपूर मार्गे सुरू करण्यात आली आहे. वर्धा नदीच्या पाण्यात सातत्याने वाढ होत असून सध्या नदीचे पाणी नवीन पुलापर्यंत पोहोचले आहे. वर्धा नदीपासून काही अंतरावर असलेले तीन माळ्याचे वेदा रेस्टॉरन्ट हे गेल्या महिन्यात आलेल्या पुरात संपूर्ण पुराच्या पाण्याखाली आले होते. सध्या या रेस्टॉरन्टचे दोन माळे पुराच्या पाण्याखाली गेले आहे.
शेतकरी पुन्हा संकटात
जुलै महिन्यात आलेल्या पुराच्या पाण्याने तालुक्यातील शेती खरडून नेली. शेतात तलाव निर्माण झाले. हजारो हेक्टरवरील पीक वाहून गेले. अनेक शेतक-यांचे जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेले. आधीच शेतक-यांनी दुबार पेरणी केली होती. त्यातच अचानक आलेल्या पुरातून अद्यापही शेतकरी सावरलेला नाही. मात्र या बिकट परिस्थितीतही न डगमगता बळीराजा तिबार पेरणी करून नव्या जोमाने कामाला लागला. मात्र पुन्हा 15 दिवसांच्या कालावधीनंतर भीषण पूरपरिस्थिती उद्भवल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
एसडीआरएफची टीम दुपारपर्यंत वणीत
धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी दोन दिवस सुरू राहणार असल्याने जुलै महिन्यातील पूरपरिस्थिती पुन्हा उद्भवण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे एसडीआरएफचे बचाव पथक बोलवण्यात आले आहे. हे पथक मंगळवारी दुपार पर्यंत वणीत पोहोचणार आहे. सध्या तालुक्यातील बचावपथक हे बोटीसह सज्ज आहे.
Comments are closed.