जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील एका महाविद्यालयात 11 वी मध्ये शिक्षण घेत असलेली अल्पवयीन विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याची तक्रार वणी पोलीस स्टेशनमध्ये 16 सप्टें. रोजी नोंदविण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात फूस लावून पळवून नेल्याबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. नुकतेच 10 सप्टें. रोजी याच महाविद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थिनी बेपत्ता झाली होती. या विद्यार्थीचा अद्याप कोणताही शोध लागला नसताना आता पुन्हा एक विद्यार्थीनी बेपत्ता झाली आहे.
बेपत्ता तरुणीच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते तालुक्यातील एका गावात वास्तव्यास आहे. दोघे ही पती पत्नी मजुरी करतात. त्यांना 3 मुली असून मोठी मुलगी वणी येथील एका महाविद्यालयात 11 वी मध्ये शिक्षण घेत आहे. दिनांक 16 सप्टेंबर रोजी सकाळी तरुणीचे आईवडील शेतमजुरीसाठी निघून गेले. तेव्हा तिन्ही मुली घरी होत्या.
सायंकाळी आईवडील घरी आले तेव्हा मोठी मुलगी घरी दिसून आली नाही. लहान मुलींना विचारणा केली असता ताई दुपारी 12 वाजता गावातील एका मंदिरात काल्याच्या कार्यक्रमात गेल्याचे सांगितले. बराच वेळ होऊन मुलगी घरी परत आली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी गावात व नातेवाईकांकडे दोन दिवस शोध घेतले असता मुलगी मिळून आली नाही. तिच्याकडे असलेला मोबाईलसुद्धा स्विच ऑफ होता.
दोन दिवस शोध घेतल्यानंतरही मुलीबाबत कोणतीही माहिती न मिळाल्याने मुलीच्या वडिलांनी अखेर 18 सप्टें. रोजी पोलीस स्टेशन गाठून याबाबत तक्रार नोंदविली. अल्पवयीन मुलांच्या बेपत्ता होण्यासंबंधी तक्रारीत सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार पोलिसांनी कलम 363 अनव्ये गुन्हा नोंद केला आहे.
बेपत्ता महिला व मुलींच्या तक्रारीचा वणी ठाण्यात खच
वणी पोलीस स्टेशन हद्दीत महिला, तरुणी व अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. मागील 8 महिन्यात वणी येथून 57 महिला व मुली बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात आहे. त्यात अल्पवयीन तरुणी पळवून नेल्याचे प्रकरण वेगळेच आहे. एकूणच वणी पोलीस ठाण्यात महिला, तरुणी व अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या तक्रारीचा खच जमा झाला आहे.
हे देखील वाचा:
धक्कादायक – वणी उपविभागातून 8 महिन्यात 112 तरुणी व महिला बेपत्ता
Comments are closed.