वणी(रवि ढुमणे): पेट्रोल दिले नसल्याचा कारणावरून नकोडा (घुग्गुस) येथील तरुणाने जळत्या शेकोटीत पेट्रोलची भरलेली बॉटल टाकून 47 वर्षीय दुकानदाराला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे.
शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मुंगोली येथील दुकानदार योगीराज मोहजे हे सायंकाळी साडेसात वाजताचे सुमारास दुकानासमोर शेकोटी लावून बसले होते. त्याआधी गावात पेट्रोल मिळत नसल्याने त्यांनी आपल्या दुचाकीत व बॉटल मध्ये पेट्रोल आणून ठेवले होते. बॉटल दुकानाच्या काउंटरवर ठेवली व योगीराज थंडीत शेकोटीजवळ बसले. मुलगा मेघराज हा घरात जेवण करत होता. दरम्यान घुग्गुस(नकोडा) येथील हाजी शेख सरवर चा भाऊ वाजीद हा दुकानासमोर आला आणि योगीराज याला दुकानात दिसलेली पेट्रोल ची बॉटल मागितली.
योगीराज ने पेट्रोल देण्यास नकार दिल्याने वाजीद भडकला व त्याने शिवीगाळ करीत”मी कोण आहे माहीत नाही काय?” अशी बतावणी करीत दुकानाच्या काउंटरवर असलेली पेट्रोलची बॉटल उचलली व शेकोटीत टाकली. पेट्रोल शेकोटीत पडताच मोठा भडका झाला त्यात योगीराज भाजल्या गेले. शेजारी व घरातील मंडळी धावत आली आणि योगीराज च्या अंगाला लागलेली आग विझवून त्याला तात्काळ अंबुलन्स ने चंद्रपूर ला उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर हाजी गावात दाखल झाला परंतु ज्या स्कारपीओ वाहनाने आला ते वाहन त्याला तेथेच सोडून जावे लागले.
ही घटना घडताच ग्रामस्थांनी वाजीदला घेरले होते. परंतु तो तेथून निसटला. या घटनेची तक्रार योगीराज चा मुलगा मेघराज याने शिरपूर पोलिसात दिली त्यावरून वाजीद शेख विरुद्ध भारतीय दंड विधान कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहे.