भावपूर्ण वातावरणात वणीकरांनी घेतले वीर सुपुत्राचे अंत्यदर्शन…

ले. कर्नल वासूदेव आवारी यांच्यावर आज स. 10.30 वा. मुर्धोनी येथे अंत्यसंस्कार.... ...आणि वणीकरांसह वरूणराजाचीही मानवंदना...

जितेंद्र कोठारी, वणी: ले. कर्नल वासूदेव आवारी यांचे पार्थिव गुरुवारी रात्री 8.30 वाजता वणीत पोहोचले. नागपूरहून पार्थिव वणी येथे येणार असल्याने कळल्याने संध्याकाळपासूनच वणीकरांनी टागोर चौक मार्गावर एकच गर्दी केली होती. टागोर चौक येथील त्यांच्या घरी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी भारत माता की जय, ‘वीर शहीद वासुदेव आवारी अमर रहे’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला. अनेकांंना यावेळी अश्रू अनावर झाले. आज शुक्रवारी दिनांक 7 ऑक्टोबर सकाळी 10.30 वाजता मुर्धोणी येथील सार्वजनिक प्रांगणात वासूदेव आवारी यांच्यावर हिंदू रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

गावागावातील नागरिक अखेरच्या दर्शनासाठी हायवेवर
ले. कर्नल वासुदेव आवारी यांचे पार्थिव गुवाहाटीवरून गुरुवारी सायंकाळी 5 वाजता नागपूर विमानतळावर पोहचले. त्यानंतर त्यांना कामठी मिलीट्री बेसतर्फे सैन्य दलातील सर्व सोपस्कार पूर्ण करून मानवंदना देण्यात आली. लष्करी वाहनाने त्यांचे पार्थिव वणी येथे आणले गेले. पार्थिव येणार असल्याचे कळाल्याने गावागावातील नागरिक रात्री रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. गावातून ताफा जाताच त्यांनी फुलांचा वर्षांव करत व ‘वासूदेव आवारी अमर रहे’च्या घोषणा देत त्यांनी वासूदेव आवारी यांना श्रद्धांजली वाहिली. रात्री 8.30 वाजताच्या सुमारास त्यांचे पार्थिव वणी येथे पोहोचले. यावेळी त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी हजारो नागरिकांची गर्दी उसळली होती. रात्री 11.30 वाजता त्यांचे पार्थिव मुर्धोनी येथे आणण्यात आले. त्यावेळी संपूर्ण गाव जागे होते. मुर्धोनी, परसोनी व परिसरातील गावकरी गोळा झाले होते. गावात ठिकठिकाणी मेणबत्ती लावून गावक-यांनी श्रद्धांजली वाहिली.

…आणि नागरिकांसह वरूणराजाचीही सलामी
नागपूरहून ताफा येण्याच्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वणीकरांनी एकच गर्दी केली होती. ताफा टागोर चौकात जात असताना रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या वणीकरांनी यावेळी भारत माता की जय, ‘वीर शहीद वासुदेव आवारी अमर रहे’च्या जयघोष करत वीर सुपुत्राला सलामी दिली. यावेळी अनेक वणीकरांना अश्रु अनावर झाले. त्याच वेळी पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास पाऊस कोसळला. वरुणराजानेही या वीर सुपुत्राला एकप्रकारे मानवंदनाच दिली.

लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ…

लेफ्टनंट कर्नल वासूदेव दामोदर आवारी हे 170 फिल्ड रेजिमेंट (वीर राजपूर) मध्ये कर्तव्यावर होते. नुकतेच त्यांना मेजर पदावरून लेफ्टनंट कर्नल पदावर पदोन्नती मिळाली होती. ते अरुणाचल प्रदेश येथील भारत-चीन बॉर्डरवर समुद्रतळावरून 16 हजार फूट उंचीवर (high altitude) कर्तव्य बजावत होते. मंगळवारी दुपारी कर्तव्य बजावताना त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना तात्काळ गुवाहाटीतील 151 मिलीट्री बेस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

Comments are closed.