ठाणेदारांनी 5 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप, एसपी यांनी साधला पत्रकारांशी संवाद

चोरट्याच्या पत्रकारावरील हल्ल्याचे वणीत तीव्र पडसाद, बदलीसाठी काही पत्रकारांनी सुपारी घेतल्याचा एसपींचा आरोप

जितेंद्र कोठारी, वणी: पत्रकार आसिफ शेख यांच्यावर चोरट्यांनी केलेल्या हल्ल्याचे वणीच्या पत्रकारिता क्षेत्रात तीव्र पडसाद उमटले. शहरातील सर्व पत्रकार संघटनेने या हल्लाचा निषेध केला. पत्रकार आक्रमक झाल्याचे कळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भूजबळ पाटील यांनी संध्याकाळी वणीत भेट देत घटनेचा आढावा घेतला व पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान पत्रकारांनी एसपी यांच्यासमोर ठाणेदार यांच्याविरोधात तक्रारीचा पाढा वाचला. दरम्यान शहरातील एका प्रतिष्ठीत डॉक्टरांनी एक प्रकरणात ठाणेदारांनी 5 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे एसपी यांचा पत्रकारांशी झालेला संवाद चांगलाच वादळी ठरला. एसपी यांनी सर्व बाबी तपासून लवकरच सकारात्मक कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले. दरम्यान आजपासून ठाणेदार रजेवर गेल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान मंगळवारी शहरातील समाजसेवक नारायण गोडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत ठाणेदारांची तात्काळ बदली करण्याची मागणी केली. 

पत्रकार आसिफ यांच्यावर बुधवारी पहाटे एका चोरट्याने लोखंडी रॉडने जबर हल्ला केला. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शहरातील पत्रकारांची मंगळवारी दिनांक 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता विश्रामगृहात बैठक पार पडली. वणीत सातत्याने होत असलेल्या घरफोडी, तक्रार घेण्यास टाळाटाळ तसेच वणी शहरात वाढती गुन्हेगारी लक्षात घेता गुन्हेगारीवरील ठाणेदारांचे नियंत्रण सुटल्याचा आरोप करत पत्रकारांनी ठाणेदारांचा निषेध केला. त्यानंतर शहरातील सर्व पत्रकारांनी मार्च काढत उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांना ठाणेदारांना तात्काळ हटविण्याच्या मागणीचे निवेदन दिले.

पत्रकारांनी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची देखील भेट घेतली व त्यांना याबाबत निवेदन सादर केले. आमदार बोदकुरवार यांनी तात्काळ उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्याशी संपर्क करीत वणीतील वाढत्या गुन्हेगारीबाबत माहिती दिली. तसेच वणीत पत्रकारावर चोरट्यांकडून झालेल्या हल्ल्याची माहिती देऊन शहरातील बिघडत चाललेला कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली. तसेच तातडीने ठाणेदारांची बदली करण्याची मागणी केली.

ठाणेदारांनी 5 लाखांची खंडणी मागितल्याच्या आरोप
एसपी डॉ. दिलीप भूजबळ पाटील यांनी पोलीस स्टेशन येथील दक्षता भवन येथील हॉलमध्ये प्रत्रकारांसोबत बैठक संवाद साधला. या बैठकीत पत्रकारांनी वणीत बिघडत चाललेल्या कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली. हा संवाद सुरू असताना डॉ. महेंद्र लोढा यांनी ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांनी 5 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप एसपी यांच्यासमोर केल्याने एकच खळबळ उडाली. 2021 मधील एका प्रकरणाची फाईल पुन्हा उघडून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत लोढा यांना 3 वेळा ठाण्यात बोलावले. तसेच धमकी देत 5 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावर पोलीस अधीक्षक यांनी तुम्ही भ्रष्टाचार निरोधक विभागाकडे तक्रार का नाही केली ? असा प्रतिप्रश्न केला. 

बदलीसाठी सुपारी घेतल्याचा आरोप
जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी ठाणेदार महल्ले यांच्या बदलीसाठी काही पत्रकारांनीच सुपारी घेतल्याचा आरोप केला. त्यामुळे उपस्थित पत्रकार चांगलेच संतप्त झाले. यावर पत्रकारांनी नाराजी व्यक्त करीत सुपारी घेणाऱ्या पत्रकारांचे नाव उघड करा, अन्यथा शब्द परत घ्या अशी मागणी केली. त्यावर एसपी यांनी वेळ आल्यावर सर्व पुराव्यासह उघड करु असे आश्वासन दिले. मात्र यामुळे हा संवाद चांगलाच खळबळ माजवणारा ठरला.

यावेळी रवी बेलुरकर, संतोष कुंडकर, तुषार अतकारे, सुनिल पाटील, जितेंद्र कोठारी, राजु तुराणकर, दिपक छाजेड, विवेक तोटेवार, संदिप बेसरकर, रमेश तांबे, जितू डाबरे, दिलीप भोयर, प्रवीण शर्मा, इकबाल शेख, श्रीकांत किटकुळे, सूरज चाटे, विशाल ठोंबरे, नरेंद्र लोणारे, आबिद हुसेन, प्रशांत चंदनखेडे, पुरुषोत्तम नवघरे, महादेव दोडके, मनोज नवले, अक्षय मंदाडे, निलेश चौधरी, परशुराम पोटे, राजु गव्हाणे, रामकृष्ण वैद्य, रवी कोटावार, मुस्ताक शेख, ज्ञानेश्वर बोनगिरवार, दिगंबर चांदेकर उपस्थित होते.

ठाणेदारांच्या बदलीसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देताना नारायण गोडे

हे देखील वाचा:

अखेर 7 दिवसांनी छत्रपती वॉरिअर्स संघाने उघडले खाते, रंगतदार सामन्यात विजय

राजूर बनले अवैध धंद्याचे आगार, मटका पट्टी बंद करण्याची तरुणांची मागणी

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.