जिल्हा पोलीस दलाची धुरा आता पवन बनसोड यांच्या खांद्यावर
वणी पोलीस स्टेशन ठाणेदाराबाबत संभ्रम कायम
जितेंद्र कोठारी, वणी : राज्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची बदलीचे खलबत्ते सुरु असताना यवतमाळ जिल्हा पोलिस दलाची धुरा आता औरंगाबादचे पोलीस उपायुक्त पवन बनसोड याना सोपविण्यात आली आहे. याबाबत शुक्रवार 21 ऑक्टो. रोजी राज्य गृह मंत्रालयाने सुधारित आदेश निर्गमित केले. गुरुवार 20 ऑक्टो. रोजी काढण्यात आलेल्या बदल्यांची यादीमध्ये गौरवसिंग यांची नेमणूक यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षक व पवन बनसोड यांची बदली सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक पदावर करण्यात आली होती.
नाशिक येथील पोलीस अकॅडमी अधीक्षक गौरवसिंह यांची गुरुवारी यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक पदी बदलीची माहिती मिळताच अनेक राजकीय पुढारी व अवैध व्यावसायिकांची भुवऱ्या उंचावली होती. त्यांनी तात्काळ राजकीय वजन वापरून 24 तासाच्या आत गौरवसिंह यांची नेमणूक रद्द करण्यास राज्य सरकारला भाग पाडले. त्यानंतर शुक्रवार सकाळी वर्तमान एसपी दिलीप भुजबळ पाटील यांना पुढील आदेशापर्यंत पोलीस अधीक्षक पदी कायम करण्यात आले.
शुक्रवार 21 ऑक्टो. रोजी सायंकाळ होत नाही तर यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून पवन बनसोड यांची नियुक्तीचे आदेश धडकले. शनिवार 22 ऑक्टो. रोजी पवन बनसोड यवतमाळ पोलीस अधीक्षक पदावर रूजू होईल असा अंदाज आहे. जिल्ह्यात चोऱ्या, लूटमार, गँगवार, मटका, जुगार, कोळसा चोरी, रेती तस्करी व इतर अनेक अवैध व्यवसाय फोफावले आहे. नवीन पोलीस अधीक्षक पवन बनसोड या अवैध धंद्यावर लगाम लावणार की राजकीय गुन्हेगारांच्या हाताची कठपुतली होणार ? हे येत्या काळात स्पष्ट होईल.
वणी पोलीस ठाण्याचा मालक कोण होणार ?
जिल्ह्यत सर्वात मलाईदार व कमाईदार पो.स्टे. म्हणून वणी पोलिस ठाण्याची ओळख आहे. एकदा तरी वणी पोलीस स्टेशन ठाणेदार म्हणून नेमणूक व्हावी त्यासाठी पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी जॅक व चेकचा वापर करतात. वणीचे निष्क्रिय ठाणेदार रामकृष्ण महल्लेविरुद्ध येथील पत्रकार व आमदारांनी केलेल्या तक्रारीनंतर महल्ले रजेवर आहे. त्यामुळे मागील आठ दिवसांपासून पोलीस निरीक्षक दर्जाचे पोलीस स्टेशनचा प्रभार महिला सहायक पोलिस निरीक्षक सांभाळत आहे. पोलीस अधीक्षक पवन बनसोड वणी ठाण्याची बागडोर कोणाच्या हातात देणार ? याकडे वणीकर जनतेचे लक्ष आहे..
Comments are closed.