भास्कर राऊत, मारेगाव : तालुक्यातील चोपण गावात एका 55 वर्षीय इसमाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवारी सकाळी 11 वाजता उघडकीस आली. अनंता रामचंद्र गाऊत्रे रा. चोपण असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचा नाव आहे. मारेगाव तालुक्याला आत्महत्येचे ग्रहण लागले असून शेतकरी आत्महत्याग्रस्त तालुका म्हणून मारेगावची ओळख झाली आहे.
मृतक अनंता रामचंद्र गाऊत्रे (55) हा आपल्या कुटुंबियांसोबत चोपण येथे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होता. ओवाळणीसाठी पत्नीच्या माहेरी गेलेला अनंता व त्याची पत्नी गुरुवारी सकाळीच परत आले होते. घरी आल्यानंतर काही वेळातच अनंता यांनी दोरीच्या साहाय्याने घरातच गळफास घेऊन जीवन संपविला. अनंता गाउत्रे यांनी आत्महत्या का केली याचे नेमके कारण कळू शकले नाही. मृतक अनंताच्या मागे पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा आप्त कुटुंब आहे.
कधी मिटणार आत्महत्येचा कलंक ?
मारेगाव तालुका हा आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. प्रत्येक आठवड्यामध्ये एकतरी आत्महत्या या तालुक्यामध्ये घडतांना दिसत आहे. यावर उपाययोजना होऊन त्या कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने आत्महत्या हा तालुक्याला कलंक असल्याचे अनेकांचे मत बनत आहे. या कलंकातून तालुक्याची मुक्तता कधी होणार ? याचीच तालुक्याला आस लागलेली आहे.
Comments are closed.