Breaking News: कानडा शेतशिवारात 32 लाखांचा थरारक दरोडा…

चौकीदाराला चाकू व पेचकचचा धाक दाखवत चोरट्यांनी साधला डाव....

जितेंद्र कोठारी, वणी/ भास्कर राऊत, मारेगाव: कानडा शेतशिवारातील एका साईटवर 32 लाखांचा दरोडा पडला. सोमवारी मध्यरात्री ही थरारक घटना घडली. साईटवर असलेल्या 2 चौकीदारांना 8-10 इसमांनी चाकू व पेचकचचा धाक दाखवून मारहाण केली व त्यांना बांधून चोरट्यांनी साईटवरील 32 लाखांची ऍल्युमिनियम तार चोरली. शिवाय चौकीदाच्या बॅगमधले 2 हजारांची रक्कमही लंपास केले. या प्रकरणी चौकीदाराच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वृत्त असे की, केईसी इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीद्वारा वरोरा ते वारंगल या मार्गावर शेतातून 765 केव्हीचे वायर टाकण्याचे काम सुरू आहे. सध्या या कंपनीचे मारेगाव तालुक्यातील कानडा शेतशिवारात इलेट्रीक टॉव्हर उभारून त्यावर तार टाकण्याचे काम सुरू आहे. या साईटवर सरीम आलम बाबर अली (वय 23 रा. पश्चिम बंगाल) हा गेल्या एक महिन्यापासून वॉचमनचे काम करतो. साईटच्या परिसरातच (कानडा शेतशिवार) तो एक झोपडी बनवून त्याच्या एका साथीदारासह राहतो. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत इथे काम सुरू असते. साईटवर मोठ्या प्रमाणात मौल्यवान साहित्य ठेवलेले आहे. त्यामुळे सरीम व त्याचा त्याचा साथीदार 24 तास साईटवर राहून चौकीदारीचे काम करतात.

सोमवारी दिनांक 7 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साईटवरचे काम संपल्यानंतर सरीम व त्याचा सहकारी जलील अली (55) साईट शेजारी असलेल्या झोपडीत झोपले होते. मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती साईटवर आले. आलेल्या इसमांनी दोघांना उठवून त्यांना पेचकच व चाकूचा धाक दाखवला. त्यांना मारहाण करत त्यांचा मोबाईल हिसकावून त्यांच्या मोबाईलमधले सिम काढून फेकून दिले व दोन्ही चौकीदारांना साईटच्या दूर जाऊन बसण्यास सांगितले.

त्यानंतर तिथे दोन 10 चाकी हायवा ट्रक आले. त्यातून 8-10 लोक उतरले. त्यांनी साईटवर असलेल्या हायड्रा मशिनच्या मशिनच्या साहाय्याने हाय टेंशन ऍल्यूमिनियम तारांचे बंडल उचलून ट्रकमध्ये भरण्यास सुरुवात केली. तीन तासांमध्ये त्यांनी साईटवरचे 8 बंडल (24 टन) तार उचलून दोन ट्रकमध्ये भरले.

मध्येच हायड्रा मशिन बिघडली…
चोरटे साईटवर असलेल्या हायड्रा मशिनच्या साहाय्याने ट्रकमध्ये तारांचे बंडल भरत होते. मात्र तीन तासांनंतर मशिनवर लोड आल्याने मशिनचा केबल तुटला. त्यामुळे चोरट्यांना त्यांचे काम थांबवावे लागले. हायड्रा मशिन बंद पडल्यानंतर आरोपींनी दोन्ही चौकीदाराला झोपडीच्या लाकडाला बांधले व त्यांच्या मोबाईल जवळच फेकून दिला व ते दोन ट्रक व तारांचे बंडल घेऊन तिथून निघून गेले. मशिन बंद झाल्याने अधिकचे नुकसान टळले अन्यथा आणखी लाखोंचे नुकसान झाले असते.

दुस-या दिवशी म्हणजे मंगळवारी दिनांक 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास जवळच्या गावातील एका व्यक्तीला दोन्ही चौकीदार बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. ती व्यक्ती तातडीने घटनास्थळावर गेली व त्याने दोन्ही चौकीदारांची सुटका केली. चौकीदारांनी घटनास्थळी बघितले असता तिथले ऍल्युमिनियमचे 8 ड्रम (बंडल) चोरीला गेल्याचे आढळून आले. तसेच चौकीदाराच्या बॅगमधले 2 हजार रुपये चोरीला गेल्याचे आढळले. चौकीदारांनी ठेकेदाराला फोन करून याबाबत माहिती दिली.

ठेकेदाराने याबाबत मारेगाव पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच व घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एसडीपीओ संजय पुज्जलवार व सपोनि राजेश पुरी हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी चोरट्यांनी ऍल्युनिमियम तारांचे 8 बंडल (24 टन) ज्याची किंमत 32 लाख रुपये व 2 हजार रोख रक्कम असा एकूण 32 लाख 2 हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. अज्ञात आरोपींविरोधात भादंविच्या कलम 395 व 397 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

यशोगाथा : शेतीपयोगी इलेट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीतून एका इंजिनिअरची उद्योग भरारी

भीषण अपघात- रुग्णवाहिकेची दुचाकीला जबर धडक

Comments are closed.