वाघाने झडप घालून तरुण शेतकऱ्याचा पाडला फडशा

भुरकी (रांगणा) येथील घटना, परिसरात वाघांचा मुक्त संचार, ग्रामस्थांच्या जीव टांगणीला

जितेंद्र कोठारी, वणी : शेतात बैल चारत असताना तरुण शेतकऱ्यावर झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने झडप घातली. वाघाच्या हल्ल्यात तरुण जागीच ठार झाला. अभय मोहन देऊळकर (25) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचा नाव आहे. तालुक्यातील भुरकी (रांगणा) शेत शिवारात गुरुवार 10 नोव्हेंबर रोजी ही हृदयविदारक घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार भुरकी (रांगणा) येथील अभय देऊळकर नेहमीप्रमाणे आपले बैल घेऊन शेतात गेला होता. शेतालगत नदी काठावर बैल चारत असताना झुडपात दबा धरुन बसलेल्या वाघाने अचानक मागून झडप घातली. वाघाच्या जबड्यात सापडलेल्या अभयने आरडाओरड केली. आवाज ऐकून बाजूच्या शेतातील रामदास आगलावे आणि प्रकाश बोबडे यांनी धाव घेतली. तेव्हा त्यांना वाघ अभय देऊलकर याला फरफटत नेत असल्याचे दिसून आले.

वाघाने शिकार केल्याची माहिती मिळताच संपूर्ण गावकरी जमा झाले व त्यांनी शोधाशोध केली असता झुडपात अभयचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी, वन विभागाचे अधिकारी तसेच मंडळ अधिकारी व तलाठी घटनास्थळी पोहचले. वाघाच्या हल्यात गावातील एका तरुण शेतकऱ्यांनी जीव गमावल्या घटनेमुळे गावात प्रचंड रोष निर्माण झाला होता. नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यासह मृतकाच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत व कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याची मागणी करत मृतदेह हलविण्यात गावकऱ्यांनी नकार दिला.

घटनास्थळी तणावाचे वातावरण बघता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.

वाघांचा मुक्त संचार आणि नागरिकांचा जीव टांगणीला
वणी परिसरात उकणी, भालर, नायगाव, घोंसा या कोळसा खाणी भागात तसेच वर्धा नदी खोऱ्यात मागील काही महिन्यांपासून वाघांचा मुक्त संचार आहे. परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांना वाघाने भक्ष्य केले. मात्र वाघाने मानवी शिकार केल्याची घटनेमुळे शेतात जाणाऱ्या शेतकरी, शेतमजूर व नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. असे सांगितल्या जाते की वाघाला एकदा मानवी रक्ताची चटक लागली तर तो पुन्हा दुसरा शिकार शोधतो. त्यामुळे या वाघाला त्वरित बंदिस्त केल्याची ग्रामस्थांची मागणी आहे

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.