मोठी बातमी – बाबाजी दाते महिला बँकेचा परवाना कायमस्वरूपी रद्द

आजपासून बँकिंग व्यवहार करण्यावर रिझर्व्ह बँकेची बंदी

जितेंद्र कोठारी, वणी : यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँक लिमिटेड यांचा बँकिंग परवाना रद्द करण्यात आला आहे. शुक्रवार 11 नोव्हेंबर 2022 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी काढलेल्या एका नोटिफिकेशन अन्वये महील बँकेला शनिवार 12 नोव्हेंबर पासून कोणतेही बँकिंग व्यवहार करण्यास मनाही करण्यात आली आहे. बँकेची सध्याची आर्थिक स्थितीत बँक तिच्या सध्याच्या ठेवीदारांना पूर्ण पैसे देऊ शकणार नाही. बँकेला बँकिंग व्यवसाय चालू ठेवण्याची परवानगी दिल्यास सार्वजनिक हितावर विपरित परिणाम होईल. बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईच्या शक्यता नाहीत. त्यामुळे सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांचे निबंधक, महाराष्ट्र यांना देखील बँक बंद करण्याचा आदेश जारी करण्याची विनंती करण्यात आली आहे.

बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्ट, 1949 च्या कलम 56 सह 5 (b ) नुसार लिक्विडेशन झाल्यावर महिला बँकेच्या प्रत्येक ठेवीदाराला त्याच्या/तिच्या ठेवींची रक्कम रु. 5 लाखच्या आर्थिक मर्यादेपर्यंत ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) च्या अधीन राहून ठेव विमा दाव्याची रक्कम प्राप्त करण्याचा अधिकार असेल. बँकेने सादर केलेल्या आकडेवारीनुसार सुमारे 79% ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम डीआयसीजीसी कडून मिळण्याचा अधिकार आहे. 16 ऑक्टोबर 2022 पर्यंत बँकेच्या संबंधित ठेवीदारांकडून प्राप्त झालेल्या इच्छेच्या आधारावर DICGC कायदा 1961 च्या कलम 18A च्या तरतुदींनुसार डीआयसीजीसीने एकूण विमा उतरवलेल्या ठेवींपैकी 294.64 कोटी आधीच भरले आहेत.

बँकेच्या सीईओ, माजी अध्यक्षसह 8 जणांवर फौजदारी गुन्हा ..!
बाबाजी दाते महिला सहकारी बँकेत लाखों रुपयांची आर्थिक अनियमितता व ग्राहकांची फसवणूक केल्या प्रकरणी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुजाता महाजन, माजी अध्यक्ष विद्या केळकर, जया कोषटवार, दीपिका गंगमवार, रजनी ठाकरे, शुभांगी ढोले, सचिन मॅडमवार, मंगेश मॅडमवार या आठ जणांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात वरील सर्व संचालकांना अटक होण्याची शक्यता आहे.

Comments are closed.