पोलीस भरतीची तयारी करणा-या विद्यार्थ्यांचा वणीत विराट मोर्चा

नॉन क्रिमीलिअरबाबतचा संभ्रम दूर करण्याची मागणी, डॉ. महेंद्र लोढा व प्रा. दिलीप मालेकर यांच्या नेतृत्त्वात मोर्चाचे आयोजन

विवेक तोटेवार, वणी: 9 नोव्हेंबर रोजी शासनाने पोलीस भरतीचे परिपत्रक जाहीर केले. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या पोलीस भरतीला गती मिळाली. जवळपास 18331 पदाची महाभरती पक्रिया सुरू झाल्याने तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु शासनाने भरतीसाठी कागदपत्राची यादी दिली ज्यामध्ये नॉनक्रिमिलेअर 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 याच वित्तीय वर्षांतील असावे, अशी अट घातली. त्याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात नाराजीचा सूर आहे शिवाय यामुळे संभ्रम देखील निर्माण झाला आहे. हा संभ्रम दूर करण्याकरिता गुरुवारी 10 नोव्हेंबर रोजी वणीत विद्यार्थ्यांनी भव्य मोर्चा काढला. पाण्याची टाकी येथून निघालेला हा मोर्चा जोरदार घोषणाबाजी करत तहसिल कार्यालयावर धडकला. डॉ. महेंद्र लोढा व प्रा. दिलीप मालेकर यांच्या नेतृत्त्वात हा मोर्चा निघाला. यावेळी विद्यार्थ्यांनी उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देत नॉन क्रिमीलेअर बाबत असलेला गोंधळ दूर करावा अशी मागणी केली.

9 नोव्हेंबर 2022 रोजी पोलीस महासंचालक यांच्याकडून पोलीस भरती 2021 करीता सूचनपत्रक प्रसिद्ध करण्यात आले. या सूचना पत्रकात विद्यार्थ्यांना 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या वित्तीय वर्षातील नॉन क्रिमीलेअर सादर करावे अन्यथा निवड रद्द करण्यात येईल अशी सूचना आहे. परंतु सदर भरतीची जाहिरात ही 2021 साठी काढली व त्याची सूचना 9 नोव्हेंबर 2022 ला प्रसिद्ध झाली. त्यामुळे 2021 चे नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट नसल्याने विद्यार्थी निवडीपासून वंचित राहतील का ? असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला आहे.

नॉन क्रिमेलिअर हे तीन वर्षासाठी ग्राह्य धरले जाते. जर 2022 ला काढले तर ते 22, 23 व 24 या वित्तीय वर्षासाठी ग्राह्य धारक जाते. परंतु 2021 मध्ये सर्टिफिकेट काढले नसल्यास त्यांना निवडीपासून वंचित ठेवण्यात येणार काय ? हा संभ्रम दूर करण्यात यावा यासाठी परिसरातील पोलीस भरतीची तयारी करणा-या विद्यार्थ्यांद्वारा निवेदनातून मागणी करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

वय वाढवून उपयोग काय..? – डॉ. महेंद्र लोढा
2021 हे कोरोना वर्ष होते. या काळात स्पर्धा परीक्षा झाल्या नाहीत. त्यामुळे लाखो तरूणांनी नॉनक्रिमीलेअर काढले नाहीत. 2019 वर्षात ज्याची वयोमर्यदा संपलेली होती. त्यांना शासनाने 3 वर्ष वय वाढवून दिले. त्यामुळे त्या सर्वांनी या महिन्यात प्रमाणपत्र व कागदाची जमवाजमव केली आहे. जर यात बदल झाला नाही तर वय वाढवून देण्याचा उपयोग काय ? किंवा कोरोना काळात संचारबंदी असताना सर्वांनी कागदपत्राची पूर्तता कशी करावी? नव्याने भरतीस पात्र उमेदवाराचे काय? या संभ्रम शासनाने दूर करणे गरजेचे आहे.
– डॉ. महेंद्र लोढा, नेते, काँग्रेस

दरवर्षी 10 ते 12 लाख मुलांच्या मोठा आकडा भरतीला उतरतो पैकी 50% उमेदवाराकडे 2021 वित्तीय वर्षांतील नॉनक्रिमीलेअर नाही त्यामुळे त्यांच्या भरतीच्या आशा मावळल्या आहे. याविरोधात मोठ्या प्रमाणात राज्यभरात विरोध केला जात आहे.

हे देखील वाचा: 

मोठी बातमी – बाबाजी दाते महिला बँकेचा परवाना कायमस्वरूपी रद्द

खुशखबर – लॉयन्स कॉलेजमध्ये बी.एस.सी., बी.कॉम. प्रथम वर्षासाठी प्रवेश सुरु

मटका जुगार अड्यावर धाड: चार आरोपींना अटक

Comments are closed.