वणीत सकल जैन समाजाचा भव्य मुक मोर्चा व निवेदन

सम्मेद शिखर तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळ घोषित करण्यास जैन समाजाचा विरोध

जितेंद्र कोठारी, वणी: जैन समाजाचे पवित्र श्रद्धास्थान असलेल्या श्री सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळ बनवण्याचा प्रस्ताव झारखंड सरकार यांनी केंद्र सरकारकडे पाठविला आहे. त्याच्या विरोधात वणी येथील सकल जैन समाजाच्या वतीने बुधवारी दिनांक 21 डिसेंबर रोजी निषेध मोर्चा काढण्यात आला. येथील जैन स्थानक मध्ये विराजमान जैन मुनी अक्षयऋषी म.सा. आदि ठाणा 3 यांचे दर्शन घेऊन जैन समाजाच्या शेकडो महिला पुरुषांनी अहिंसेचा मार्ग अवलंबत झारखंडमधील जैन तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरजीला पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करण्यास विरोध केला.

यावेळी उपस्थित महिला व पुरुषांनी शहरातील प्रमुख मार्गावरून मूक मिरवणूक काढून उपविभागीय अधिकारी कार्यालय गाठले. उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देताना केंद्र सरकारला हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली. झारखंडमधील जैन समाजाचे प्रसिद्ध आणि प्रमुख तीर्थक्षेत्र समेद शिखर जी यांचा देशातील पर्यटन स्थळांच्या यादीत समावेश करण्याला देशभरातील जैन समाजाकडून विरोध होत आहे. झारखंड राज्यातील गिरीडीह पर्वतावर स्थित समेद शिखर जी हे जैन समाजाचे सर्वात महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे.

या प्रदेशातून 20 तीर्थंकरांनी मोक्ष प्राप्त केल्याचे सांगितले जाते. जैन समाजासह इतर समाजाची श्रद्धाही या परिसराशी जोडलेली आहे. दरवर्षी देश विदेशातून लाखो भाविक भक्ती आणि धार्मिक विधी करण्यासाठी कुटुंब आणि समाजातील सदस्यांसह येथे पोहोचतात. सम्मेद शिखरजीला पर्यटन स्थळ बनविल्यास या तीर्थक्षेत्राची पावित्र्यता नष्ट होईल. त्यामुळे देश भरातील जैन समाजाकडून या निर्णयाचा कडाडून विरोध केल्या जात आहे.

सकल जैन संघ वणी तर्फे महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांना याबाबत निवेदन पाठविण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे यांना निवेदन देताना स्थानकवासी जैन श्रावक संघ अध्यक्ष चंद्रकुमार चोरडिया, तेरापंथी जैन महासभा अध्यक्ष सुभाष गेलडा, संभवनाथ श्वेताम्बर जैन मंदिर अध्यक्ष राजेंद्र मेहता, दिगंबर जैन समाज अध्यक्ष कमलाकर चुंबळे, जैन त्रिशला बहु मंडळ अध्यक्ष मनीषा कटारिया, जैन महिला मंडळ अध्यक्ष ज्योती मुथा, डॉ. महेंद्र लोढा, अशोक भंडारी, माणकचंद कोटेचा, राजेंद्र खिंवसरा, दीपक छाजेड, आनंद झामड, नरेंद्र काठेड, प्रियंका लोढा, कल्पना छाजेड व शेकडो जैन बंधू भगिनी उपस्थित होते.

पर्यटन स्थळ घोषित केल्यास जनआंदोलनाचा इशारा
समेद शिखरजी या पवित्र तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळ बनवल्यास संपूर्ण देशाच्या समाजाच्या श्रद्धेला तडा जाईल. लोक पर्यटनस्थळी भक्तीसाठी जात नाहीत, तर मनोरंजनासाठी जातात. अशी समाजातील लोकांची धारणा असून तीर्थक्षेत्रात केवळ पूजेची भावना असते. या शांततापूर्ण आंदोलनानंतर आपल्या मागण्या मान्य न झाल्यास जैन समाजाकडून मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा यावेळी डॉ. महेंद्र लोढा यांनी दिला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.