तेरवीला जातो असे सांगून गेलेल्या शेतक-याचा आढळला शेतात मृतदेह

विष प्राशन करून शेतक-याने संपवले जीवन, मारेगाव तालुक्यातील शेतकरी आत्महत्या कधी थांबणार?

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील नरसाळा येथील शेतकरी रामदास केशव ठाकरे (60) यांनी मंगळवारी दि. 20 डिसेंबरला विष प्राशन करून आपले जीवन संपवले. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. शेतात समाधानकारक उत्पन्न होत नसल्याने, कुटुंबाचा उदरनिर्वाह तसेच कर्जाची परतफेड कशी करावी, या विवंचनेतून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेने नरसाळा गावावर शोककळा पसरली.

रामदास केशव ठाकरे (60) हे नरसाळा येथील रहिवासी होते. त्यांच्याकडे 5 एकर शेती आहे. दि. 20 डिसेंबरला रोज मंगळवारला सं. 5 वाजताच्या सुमारास नातेवाईकाकडे असलेल्या तेरवीच्या कार्यक्रमाला जातो असे सांगून ते घरातून निघाले. मात्र कार्यक्रमाला न जाता ते तिथून त्यांच्या शेतामध्ये गेले. तेथे फवारणीसाठी ठेवलेले मोनोसिल नावाचे पिकांवर फवारणीचे औषध प्राशन केले.

रात्री रामदास ठाकरे हे घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे फोन केला. मात्र तेरवीच्या कार्यक्रमाला ते पोहोचले नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यांनी जवळच्या लोकांकडे विचापूस केली. मात्र त्यांचा काही पत्ता लागला नाही. ते शेतात गेले असावे असे समजून त्यांचे कुटुंबीय सकाळी शेतामध्ये गेले. तेव्हा शेतातील कपाशीच्या झाडामध्ये ते पडून असल्याचे दिसले. जवळ जाऊन बघितले असता ते मृतावस्थेत दिसले.

रामदास यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, सून नातवंड असा आप्त परिवार आहे. शेतामधून त्यांना पुरेसे उत्पन्न होत नव्हते. अशातच पाऊस आणि वातावरण योग्य साथ देत नसल्याने उत्पन्नामध्ये मोठया प्रमाणावर घट झाली होती. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त यामुळे कर्ज वाढत गेले. आणि याच नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असे बोलले जात आहे. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणला असून पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

Comments are closed.