चोपण येथे रंगला कब बुलबुल मेळावा, चिमुकल्यांचे नृत्य ठरले प्रमुख आकर्षण

तालुक्यातील सर्वच शाळांचा सहभाग, 'या' शाळांनी मिळवला पुरस्कार...

भास्कर राऊत, मारेगाव: डोळ्यांची पारणे फेडणाऱ्या सदाबहार नृत्यांनी चोपण येथील कब बुलबुल मेळाव्याची सांगता झाली. शुक्रवारी दि. 6 जानेवारीला घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शारदा गोहोकर होत्या तर कार्यक्रमाचे उदघाटन गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कांडुरवार होते. कब बुलबुल आनंदोत्सवमध्ये तालुक्यातील सर्वच शाळांनी सहभाग नोंदवला होता. यात कब मध्ये जि. प. शाळा वेगावने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय वरुड शाळेने, तर तृतीय क्रमांक गौराळा शाळेने पटकावला. बुलबुलमध्ये वेगाव शाळा प्रथम, पहापळ शाळा द्वितीय तर नरसाळा शाळेने तृतीय क्रमांक पटकावला.

सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाची स्पर्धात्मक मेजवानी रसिकांसाठी ठेवण्यात आलेली होती. दोन वयोगट ठेवण्यात आलेले होते. वयोगट 6 ते 11 एक गट तर वय 11 ते 14 असा दुसरा गट होता. यामध्ये 6 ते 11 या वयोगटामध्ये बोटोनी शाळेने प्रथम, किन्हाळा शाळा द्वितीय तर सराटी शाळेने तृतीय क्रमांक पटकावला. याच गटातून मजरा शाळेने प्रोत्साहनपर बक्षीस पटकावले.

11 ते 14 वयोगटामध्ये सिंधी शाळेने प्रथम, पहापळ शाळेने द्वितीय, तर सराटी शाळेने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच या गटातून गौराळा आणि चोपण शाळेला प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. संपूर्ण दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमाचे संचालन आरती रहाणे आणि मंगेश बोखरे यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक गणेश भोयर यांनी तर उपस्थितांचे आभार विजय परचाके आणि सुधाकर उताणे यांनी मानले.

गटशिक्षणाधिकाऱ्यांनी वेधले सर्वांचे लक्ष
शैक्षणिक कार्यासोबतच क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यामध्ये विशेष रुची असलेले गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कांडुरवार यांनी सकाळी उदघाट्न झाल्यानंतर ते रात्री 11 वाजेपर्यंत चाललेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती दर्शवून शिक्षक तसेच उपस्थितांचा आनंद द्विगुणित केला. एका अधिकाऱ्यांनी एवढा वेळ कार्यक्रमाला देऊन तालुक्यात एक नवा पायंडा निर्माण केला. यासह ते स्वतः उपस्थितांमध्ये जाऊन रममान झाले होते. त्यांच्या उपस्थिती व उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले शिवाय गावक-यांनीही समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्राजक्ता खिरटकर, माजी केंद्रप्रमुख लक्ष्मण ईद्दे, तालुका कब मास्टर अशोक चटप, विस्तार अधिकारी जानराव शेडमाके, उपसरपंच अजय आसूटकर, व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष गुणवंत धोंगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. नृत्य बघण्यासाठी गावातील तसेच शेजारील गावातील नागरिकांनी मोठया प्रमाणावर गर्दी केलेली होती. या संपूर्ण कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यासोबतच नागरिकांनीही सहकार्य केले.

 

Comments are closed.