वर्धा नदीच्या पात्रातून बोटीद्वारे वाळूचा अवैध उपसा
रांगणा शिवारातील वर्धा नदीच्या पात्रात वाळूमाफियांची मुजोरी
वणी(रवि ढुमणे): वणी तालुक्यातील भुरकी-रांगणा या गावाच्या हद्दीला लागूनच असलेल्या भद्रावती तालुक्यातील मनगाव येथील वर्धा नदीच्या पात्रात यंत्राच्या बोटीने सर्रास वाळू उपसा केल्या जात आहे. मात्र या अवैध वाळू उपशाला प्रशासन जणू पाठबळ देत असल्याने वाळू माफियांना जणू रानच मोकळे झाले आहे. या अवैध वाळू उपसा प्रकारात मात्र शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे.
वणी तालुक्यातील भुरकी घाटालगत असलेल्या भद्रावती तालुक्यातील मनगाव येथील घाटात घाटाचा लिलाव घेणाऱ्या कंत्राटदाराने वाळू उपसा करण्यासाठी थेट पाण्यात चालणारी यंत्राची बोट आणून नदीच्या पाण्यातून त्या यंत्राद्वारे वाळू उपसा करायला सुरुवात केली आहे. शासनाच्या नियम व अतिप्रमाणे उपसा करण्यासाठी कोणत्याही यंत्राचा वापर करण्याची मुभा नसते. मात्र मनगाव रेती घाट लिलाव घेणाऱ्या कंत्राटदाराने प्रशासकीय यंत्रणा आपल्या बाजूने वळवीत सर्रास अवैध वाळू उपसा करायला सुरुवात केली आहे.
लगतच असलेल्या रांगणा शिवारातील अनिल सोनटक्के यांच्या शेत सर्वे क्रमांक 75/1 या शेतकऱ्याच्या हद्दीत असलेल्या शेताच्या काठवरूनच पाण्यातून वाळू उपसा करायला सुरुवात केली आहे. नियमबाह्य वाळूचा उपसा होत असताना स्थानिक प्रशासन व अधिकारी मात्र अर्थपूर्ण दुर्लक्ष करूनच वाळू माफियांना जणू पाठबळच देत आहेत.
वर्धा नदीच्या वाळूला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. लिलाव घेणारे कंत्राटदार स्थानिक घाटात मुजोरी करीत वाळूचा उपसा करत असल्याचे बघायला मिळत आहे. या अवैध वाळू उपशात शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. या गंभीर प्रकाराकडे वरिष्ठांनी लक्ष पुरविण्याची गरज आहे.