स्पेशल रिपोर्ट: वणीकरांवर गढूळ व अंडोळ्यायुक्त पाणी पिण्याची वेळ

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या काही काळापासून वणीकरांना नगरपालिकेतर्फे घाण, दुर्गंधीयुक्त व अनियमीत पाणी पुरवठा केला जात होता. त्यामुळे वणीतील विविध भागातील संतप्त महिलांनी नगरपालिका व तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर प्रशासनाने पाणी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. मात्र या आश्वासनाची पूर्तता तर झाली नाही, उलट वणीतील अनेक ठिकाणी नळातून अंडोळ्यायुक्त पाणी पुरवठा झाल्याने नागरिक आणखीच संतप्त झाले आहे. या प्रकरणी माजी नगरसेवक राजू तुराणकर यांनी ऑनलाईन तक्रार दाखल केली होती. यावर ही समस्या सुटली असल्याचा त्यांना प्रशासनाद्वारा रिप्लाय मिळाला. मात्र कोणतीही समस्या सुटली नसतानाही प्रशासनाने समस्या सुटल्याचा दावा कसा केला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

गेल्या 3 ते 4 महिन्यांपासन वणीतील विविध भागांमध्ये अशुद्ध व अनियमित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी अनेकदा मुख्याधिकारी, आमदार यांची भेट घेऊन आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. मात्र समस्या न सुटल्याने राजू तुराणकर यांच्या नेतृत्त्वात महिला पालिका कार्यालय व तहसीलवर धडकल्या होत्या. माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे या प्रश्नी आक्रमक झाले होते. त्यांनी मुख्याधिकारी यांची भेट घेऊन त्यांना समस्या सोडवण्याबाबत अल्टिमेटम दिला होता. याची दखल घेऊन रांगणा भूरकी पाईपलाईनची डागडुजी करण्यात आली. मात्र शुद्ध पाण्याची समस्या काही सुटली नाही.

अनेक परिसरात नळाद्वारे अंडोळ्यायुक्त पाणी
गेल्या आठवड्यात माळीपुरा येथील काही घरात अंडोळ्यायुक्त पाणी आले. या घटनेच्या दोन दिवसांनी गौरकार कॉलोनी येथे अंडोळ्यायुक्त पाण्याचा पुरवठा झाला. यासह जिल्हा परिषद कॉलोनीतील काही भाग, लक्ष्मीनगर, गुरुनगर, पंचशील नगर, जैन ले आऊट, भोंगळे ले आऊट, विठ्ठलवाडी, माळीपुरासर शहरातील इतरही भागात नळातून दुर्गंधीयुक्त, गढूळ व हिरवे पाणी येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यातच काही ठिकाणी अंडोळ्यायुक्त पाण्याचा पुरवठा झाल्याने काही नागरिकांनी याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियातून व्हायरल केलेत. सोबत वणीतील अनेक ठिकाणी अपु-या व अनियमीत पाण्याची समस्या देखील आहे.

प्रशासनाने दिशाभूल केली – राजू तुराणकर
मी 12 नोव्हेंबर रोजी गढूळ व अनियमीत पाणी समस्येबाबत शासनाच्या आपले सरकार पोर्टलवर तक्रार नोंदवली होती. त्यावर प्रशासनाद्वारे ही समस्या सोडवली गेल्याचा रिप्लाय आला. मात्र प्रत्यक्षात पाणी समस्या सुटलेली नाही. उलट वणीतील ठिकठिकाणाहून गढूळ व अंडोळ्यायुक्त पाणी येत असल्याच्या तक्रारी येत आहे. पाण्याची समस्या कायम असताना प्रशासनाने समस्या सुटल्याचा दावा करणे म्हणजे ही सर्वसामान्यांची दिशाभूल आहे. याची चौकशी व्हायला पाहिजे. लवकरात लवकर ही समस्या सुटली नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल.
– राजू तुराणकर, माजी नगरसेवक

प्रशासनाचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
ठिकठिकाणी नळातून अंडोळ्यायुक्त पाण्याचा व गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. पाणी पुरवठा करण्याच्या आधी या पाण्याचे शुद्धीकरण व निर्जंतूकीकरण होते की नाही? असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करीत आहे. अशुद्ध पाण्याच्या पुरवठ्यामुळे अनेकांनी पिण्यासाठी पाणी विकत घेण्याचा पर्याय स्वीकारला आहे. मात्र गोरगरीबांना अद्यापही पालिकेद्वारा होणा-या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. शिवाय बाहेरच्या वापरासाठीही सर्वांनाच पालिकेच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे नागरिकांना नाईलाजाने गढूळ व दुर्गंधीयुक्त पाण्याचा वापर करावा लागत आहे. परिणामी नागरिक चांगलेच संतप्त झाले आहे. 

पाण्याचा अपव्यय….

ढुमे नगर व गौरकार कॉलोनीत पाण्याचा अपव्यय
जगन्नाथ महाराज मंदिरासमोर असलेल्या पाईपलाईनमधून सारखे पाणी जाते. काही सुज्ञ नागरिकांनी यावर पोते टाकून मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला. मात्र ही केवळ मलमपट्टीच ठरत आहे. तर विठ्ठलवाडीतील गौरकार कॉलोनीतील पाईपलाईन गेल्या दीड महिन्यांपासून फुटलेली आहे. यामुळे परिसरात पाण्याचे डबके साचले आहे. एकीकडे वणीकरांना अपु-या पाण्याची समस्या झेलावी लागत असताना दुसरीकडे मात्र पाण्याचा अपव्यय होतानाचे चित्र दिसत आहे. तर प्रगती नगर येथील पाण्याची टाकीची गेल्या पाच वर्षांपासून एकदाही साफसफाई झाली नसल्याचा आरोप प्रगती नगर येथील रहिवासी करीत आहे.

उन्हाळा लागला असून एप्रिल महिन्यात उन्हाची दाह आणखीनच वाढणार आहे. उन्हाळा लागताच अपु-या पाण्याची समस्या सुरू होते. मात्र आता अपु-या पाण्यासह वणीकरांना दुर्गंधीयुक्त, गढूळ, अशुद्ध पाण्याच्या समस्येलाही तोंड द्यावे लागत आहे. या प्रश्नावर प्रशासन आता काय भूमिका घेते याकडे वणीकरांचे लक्ष लागले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.