जितेंद्र कोठारी, वणी: लोन देण्याचे आमिष दाखवून वणीतील एका बिल्डरची सुमारे 23 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी गुजरात येथील तीन आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींनी लोन पास करण्यासाठी वेगवेगळे कारण सांगून पहिल्यांदा 11 लाख, दुस-यांदा 5 लाख, तिस-यांदा 5 लाख 55 हजार व चौथ्यांदा 1.5 लाख रुपये बिल्डरकडून उकळले. मात्र 8 ते 9 महिन्यानंतरही लोन पास न झाल्याने आर्थिक फसवणूक झाल्याचे बिल्डरच्या लक्षात आले. अखेर बिल्डरने वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दाखल केली.
सविस्तर वृत्त असे की अजिंक्य मोहन मत्ते हे शहरातील वणी येथील रविनगर येथील रहिवासी आहे. ते जगन्नाथ डेव्हलपर्स या फर्मचे को फाउंडर आहे. फर्मला व्यवसायासाठी फायनान्सची गरज होती. त्यामुळे अजिंक्य हे खासगी फायनान्स कंपनीकडून लोन घेण्याच्या प्रयत्नात होते. दरम्यान गेल्या वर्षी त्यांना नागपूर येथील पाठक नामक एका व्यक्तीकडून वडोदरा येथील सुयोग फायनान्स ही कंपनी व्यवसायासाठी लोन देत असल्याची माहिती मिळाली. पाठक यांनी परमानंद आहुजा, पियूषभाई जयंतीभाई मकाडीया उर्फ विवेक पटेल, सुयोग फायनान्सचे नैनाबेन एम महिदा (सर्व राहणार जिल्हा वडोदरा गुजरात) या तीन लोकांची भेट करून दिली.
या तिघांनी अजिंक्य यांना व्यावयासिक लोनसाठी स्टॅम्प ड्युटी व प्रोसेसिंग फिस असे 11 लाख रुपये द्यावे लागणार असल्याचे सांगितले. 21 जुलै 2022 मध्ये अजिंक्य यांनी बँकेतून आहुजा याच्या बँक अकाउंटमध्ये आरटीजीएसद्वारे 11 लाख रुपये पाठवले. मात्र जगन्नाथ डेव्हलपर्सचे लोन पास झाले नाही. त्यावर आरोपींनी कर्जाची रक्कम मोठी असल्याचे कारण देत डॉक्युमेंट चार्ज व प्रोसेसिंग फिससाठी आणखी 5 लाख 55 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे 23 जुलै 2022 रोजी जगन्नाथ डेव्हलपर्सतर्फे सुयोग फायनान्सच्या बँकेच्या खात्यात 3.55 लाख रुपये तर नैनाबेन एम महिदा हिच्या वैयक्तिक अकाउंटवर प्रोसेसिंग फिससाठी 2 लाख रुपये असे एकूण 5 लाख 55 हजार रुपये पाठवले. मात्र त्यानंतरही लोन पास झाले नाही.
तिस-या वेळी आरोपींनी अजिंक्य यांची भेट घेत त्वरित कर्ज मंजूर करण्यासाठी आणखी 5 लाखांची मागणी केली. यावेळी अजिंक्य यांनी ज्योती रामकेलवन यादव या अकाउंटमध्ये 5 लाख रुपये आयटीजीएस करुन पाठवले. पैसे पाठवल्यानंतर काही वेळाने आरोपी मकाडिया याने फोन करून लोन पास झाल्याचे सांगितले. मात्र लोन रिलिज करण्यासाठी फायनान्स कंपनीचे अधिकारी 1.5 लाखांची मागणी करत असल्याची बतावणी केली. जगन्नाथ डेव्हलपर्सतर्फे त्याच दिवशी महेंद्र मंगलदास पटेल या खात्यावर 1.5 लाख रुपये आरटीजीएसद्वारा ट्रान्सफर केले गेले.
त्यानंतर अजिंक्य यांनी लोनची रक्कम कधी जमा होणार याबाबत या तिघांना विचारणा केली असता आरोपींनी एक दोन दिवस असे कारण सांगत वेळ मारून नेली. तेव्हापासून अजिंक्य हे तिघांकडे लोनबाबत विचारणा करत होते. मात्र त्यांची कधी 8 दिवस तर कधी 15 दिवस अशा तारखा देत चालढकल सुरू ठेवली. मात्र 8 ते 9 महिन्यापासून लोनची रक्कम अकाउंटमध्ये आली नाही. गेल्या 15 दिवसांपासून या तिघांनीही अजिंक्य यांचा फोन उचलणे बंद केले. अखेर 23 लाख 5 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अजिंक्य यांनी वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली.
पोलिसांनी आरोपी वरुण परमानंद आहुजा, पियूषभाई जयंतीभाई मकाडीया उर्फ विवेक पटेल व सुयोग फायनान्सच्या नैनाबेन एम महिदा यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 420 व 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.
Comments are closed.