शेतात क्रिकेट खेळताना चिमुकल्याला वीजेचा धक्का

जितेंद्र कोठारी, वणी: मित्रांसोबत शेतात क्रिकेट खेळत असताना एका 9 वर्षीय चिमुकल्याला विजेच्या जिवंत ताराचा धक्का बसला. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे. पियूष संभाशीव माहुरे (9) असे जखमी चिमुकल्याचे नाव असून तालुक्यातील लाठी शेतशिवारात ही घटना घडली. या घटनेत चिमुकल्याचा जरी जीव वाचला असला तरी यामुळे महावितरणचा भोंगळ कारभार पुढे आला आहे.

पियूष हा लाठी येथील रहिवासी आहे. मंगळवारी तो त्याच्या काही मित्रांसह गावालगतच्या शेतात क्रिकेट खेळायला गेला होता. मात्र त्यांना या शेतात विजेची जिवंत तार असल्याचे लक्षात नव्हते. खेळताना पियूषच्या शेतात पडलेल्या जिवंत तारांना स्पर्श झाला व त्याला विजेचा जबर धक्का बसला.

या अपघातात पियूष जखमी झाला. झालेली घटना बघून पियूषच्या मित्रांनी याची माहिती शेतमालकास दिली. पियूषचे पालक, नातेवाईक व काही ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पियूषला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या पियूषची प्रकृती धोक्याबाहेर असली तरी या अपघातामुळे महावितरणचा भोंगळ कारभार समोर आला आहे.

शेतमालकाने शेतात जिवंत तार कोसळल्याची माहिती महावितरणला दिली होती. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे ही घटना घडली. असा आरोप जखमीच्या नातेवाईकांनी केला आहे. दोन दिवसांआधी तालुक्यात वादळी वा-यासह पाऊस झाला होता. त्यात तार कोसळल्याची माहिती आहे. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही.

Comments are closed.