वणीत चोरट्यांची मज्जा, आता गणेशपूर रोड व भगतसिंग चौकात चोरी

जितेंद्र कोठारी, वणी: वणी शहरातील गणेशपूर रोड व भगतसिंग चौक येथे चोरट्यांनी घरफोडी केली. एका घटनेत चोरट्यांनी 43 हजारांचा मुद्देमाल तर दुस-या घटनेत चोरट्यांनी 58 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. शहरात सातत्याने होणा-या चोरीच्या घटनेमुळे वणीकर हैराण झाले आहे. मात्र पोलीस प्रशासन चोरट्यांचा शोध लावण्यात सातत्याने अपयशी ठरत आहे. त्यामुळे चोरट्यांचे चांगलेच फावत असताना दिसत आहे.

पहिली घटना ही भगतसिंग चौक पाटील वाडी येथे घडली. दिलीप राजेश्वर रामगिरवार (58) हे भगतसिंग चौकात राहतात. ते वेकोलि येथे नोकरीला आहे. 13 मे रोजी त्यांच्या एका नातेवाईकांच्या लग्नाचे रिसेप्शन होते. त्यामुळे ते सकाळी 11 वाजताच्या सुमारास घराला कुलूप लावून पत्नीसह ते पांढरकवडा येथे गेले. 20 मे रोजी संध्याकाळी ते घरी परतले असता त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले.

त्यांनी घरातील कपाट चेक केले असता त्यांना सोन्याचे मनी असलेली काळ्या मन्याची पोत (सोन्याच्या डोरल्या सहीत) ज्याची किंमत 35 हजरा रुपये, एक 3 ग्रॅम सोन्याची अंगठी ज्याची किंमत 8 हजार रुपये, तसेच एक ब्लूटूथ स्पिकर देखील चोरांनी चोरून नेल्याचे आढळले. या चोरीत चोरट्यांनी एकूण 43 हजारांचा मुद्देमाल लंपास केला.

दुसरी घटना ही गणेशपूर रोड येथे झाली. प्रशांत विजय गोहोकार (52) हे गणेशपूर रोड येथे राहतात. ते घोन्सा येथील आदर्श शाळेत शिक्षक आहेत. दिनांक 3 मे रोजी ते पत्नीसह नाशिक येथे फिरण्यासाठी गेले होते. 13 मे रोजी त्यांना चौकीदाराला त्यांच्या घरी घरफोडी झाल्याचे निदर्शनास आले. चौकीदाराने तातडीने याची माहिती गोहोकार यांना दिली. 15 मे रोजी ते घरी आले असता त्यांना घरातील तिजोरीचे कुलूप फोडलेले आढळले.

त्या तिजोरीतील देविचे दोन चांदीचे मुकुट (किंमत 10 हजार रुपये) देवीचे चांदीचे कमरपट्टे (किंमत 15 हजार रुपये), सोन्याच्या दोन अंगठ्या (किंमत 20 हजार रुपये), सोन्याची चैन ( किंमत 7 हजार रुपये) सोन्याचे डुल (किंमत 4 हजार रुपये) व नगदी दोन हजार असा एकूण 58 हजारांचा मुद्देमाल लंपास झाल्याचे आढळले. त्यांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठत याबाबत रिपोर्ट दिला.

बंद घर म्हणजे घरफोडी !
वणी शहरात चोरट्यांच्या हैदोस काही केल्या कमी होताना दिसत नाही. सातत्याने होणा-या चोरीच्या घटनांमुळे वणीतील ठाणेदारांची देखील बदली झाली. मात्र चोरट्यांचा धुमाकूळ काही केल्या कमी झाला नाही. बंद घर म्हणजे घरफोडी हे एक समीकरण झालेले आहे. या चोरीच्या घटनेत वर्षभरात चोरट्यांनी कोट्यवधींचा मुद्देमाल लंपास केला आहे. सातत्याने होणा-या चोरीच्या घटना होताना देखील अद्याप एकही प्रकरणाचा छडा पोलिसांना लावता आलेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

या दोन्ही घटनेत पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भादंविच्या कलम 380 व 457 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

Comments are closed.